समाजकारणावर राजकारणच ठरणार वरचढ?

Suresh Jain
Suresh Jain

आपला पिंड समाजकारणाचा आहे, त्यामुळे आपण सध्या तरी आता समाजकारण करणार आहोत, असे मत सुरेशदादा जैन यांनी यांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर जळगाव येथे व्यक्त केले. निश्‍चितच त्यांचा समाजकारणाकडे अधिक ओढा राहिला आहे. परंतु, तब्बल साडेचार वर्षानंतर जळगाव येथे आल्यानंतर त्यांना दररोज भेटण्यासाठी आलेल्या राजकीय व्यक्तींची गर्दी पाहता. समाजकारणापेक्षा त्यांना पुन्हा राजकीय गर्तेत ओढण्याचाच प्रयत्न अधिक दिसत आहे. आता त्यांच्या समाजकारणावर राजकारणच वरचढ ठरेल की नाही, हे येणारा काळच ठरवेल... 

समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत सुरेशदादा जैन यांनी जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले होते. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत, गरजूंना आर्थिक सहकार्य, पालिकेच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना जागा देवून उभारणीचे बळ त्यांनी दिले. समाजकारणात त्यांनी नेहमीच आपला हात "दाता‘ म्हणून ठेवला हे खरेच आहे. परंतु त्याच बळावर जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात सुरेशदादांची खऱ्या अर्थाने "दादागिरी‘च होती. त्यांनी नेहमीच आपल्या बळावर पक्षाची निवड केली आहे. प्रत्येक निर्णय त्यांनी आपल्या स्वतःच्या बळावर घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांनी एकेकाळी आपली घट्ट पकड जमविली होती. अगदी सहकारी संस्थाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या होत्या, तर जळगाव पालिका आणि आता महापालिकेवर केवळ मधला अडीच वर्षांचा काळ सोडला, तर आजही त्यांची सत्ता अबाधित आहे. 

आता साडेचार वर्षांच्या काळानंतर ते जळगावात परतल्याने त्यांच्या राजकारणाच्या पुढील दिशेबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. कारागृहात असतानाही जैन यांना शिवसेनेच्या नेत्यांनी साथ दिली. त्यांना "आपला माणूस‘ म्हणून विधानसभेत उमेदवारीही दिली, उद्धव ठाकरेंनी त्यांचा प्रचारही केला. त्यामुळे जामिनावर सुटून आल्यानंतर ते शिवसेनेला बळ देतील, असेही सांगितले जात आहे. या शिवाय खडसे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेना त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून राजकारणातून सत्ताकारणात बढती देण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

राजकीय तज्ञ जैन यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीबाबत भविष्य व्यक्त करीत असताना स्वतः सुरेशदादा जैन यांनी मात्र आपली वेगळीच भूमिका जाहीर केली आहे. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपण सध्या राजकारण नव्हे, तर समाजकारण करणार आहोत, असे जाहीर केले. त्यांच्या या वक्‍तव्यामुळे त्यांच्या राजकारणाचे सर्वच विषय सध्या थांबले असले, तरी त्यांचा समाजकारणावरच थांबण्याचाही प्रश्‍न निर्माण झाले आहे. जैन यांनी जळगावात आल्यानंतर त्यांचे प्रत्येक गावात शिवसेनेकडून झालेले जल्लोषात स्वागत महत्त्वाचे ठरले आहे. आपुलकी म्हणून त्यांचे स्वागत झाले असले, तरी त्यांच्याकडून अनेकांना अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या शिवाय त्यांना भेटण्यास येणाऱ्यांमध्ये राजकीय नेतेच मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे जैन यांच्या राजकारणात सक्रिय झाल्यास त्यांना आपले वेगळे स्थान निश्‍चित मिळणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट व महाजन यांनी त्यांच्याशी बंद खोलीत केलेली प्रदीर्घ चर्चा, या बाबी सुरेशदादांच्या राजकीय सक्रियतेकडे बोट दाखवणाऱ्याच आहेत. त्यामुळे जैन हे समाजकारणावर थांबणार असे म्हटले जात असले, तरी ते राजकारणात लवकरच सक्रिय होतील हेच दिसून येत आहे. त्यांच्या समर्थकांच्याही त्याच अपेक्षा आहेत आणि याच अपेक्षा त्यांना लवकर राजकीय प्रवाहात परत आणण्यास भाग पाडतील, एवढे मात्र निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com