सुरेशदादा जैन यांना सशर्त जामीन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जळगाव - जामनेर येथील पतसंस्थेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणातील कथित अनियमिततेप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी आमदार सुरेशदादा जैन यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने जैन यांना दर बुधवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. 

जळगाव - जामनेर येथील पतसंस्थेतून घेतलेल्या कर्ज प्रकरणातील कथित अनियमिततेप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी आमदार सुरेशदादा जैन यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने जैन यांना दर बुधवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. 

माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी सन 2010 मध्ये जामनेर शहरातील सुरेशदादा जैन पतसंस्थेतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. हे कर्ज काहीही तारण न ठेवता घेतले गेले, तसेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जामनेर तालुक्‍यापुरतेच मर्यादित असताना जळगावचे जैन यांना कर्ज देण्यात आले होते. विशेष लेखापरीक्षक दीपक अनंत अट्रावलकर यांनी सन 2016-17 या वर्षाच्या केलेल्या लेखा परीक्षणात ही बाब उघड झाली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर जिल्हा उपनिबंधकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 जुलै 2016 ला संस्थेचे पदाधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 35 जणांवर जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू असतानाच जैन यांनी व्याजासह कर्जाची दोन कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळेस भरून टाकली होती. मात्र, अनियमित कर्जप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

या प्रकरणातील संशयित युवराज राजाराम मोरे, सीमा युवराजसिंह परदेशी, सुभाषचंद्र लोढा या सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या कर्जदारांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 21) खुलासा सादर केल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळू नये, अशी जोरदार हरकत घेत सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी विरोध केला होता. ऍड. ढाके यांचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. न्या. ज्योती दरेकर यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पंचवीस हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन मंजूर केला. बचावपक्षातर्फे ऍड. आकील इस्माईल, ऍड. सत्यजित पाटील यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: Sureshad Jain gets conditional bail