सूर्यनमस्कार जीवनशैलीचा भाग व्हावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नाशिक - रथसप्तमीनिमित्त उद्या (ता. 3) जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जात आहे. तथापि, त्यानंतर अगदी पुढच्या दिवशीच सूर्यनमस्कार घालणाऱ्यांच्या संख्येचा विचार केल्यास ती नगण्य असते.

नाशिक - रथसप्तमीनिमित्त उद्या (ता. 3) जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जात आहे. तथापि, त्यानंतर अगदी पुढच्या दिवशीच सूर्यनमस्कार घालणाऱ्यांच्या संख्येचा विचार केल्यास ती नगण्य असते.

त्यानंतर सातत्यपूर्णरीत्या सूर्यनमस्कार घालणारे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आढळतात. मात्र, चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यवर्धनासाठी रोज सकाळी फक्‍त दहा मिनिटांचा सूर्यनमस्कार हे प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे तरुण मुले जिम आणि अन्य व्यायामप्रकारांकडे जसे लक्ष देतात, तसेच त्यांनी सूर्यनमस्कारालादेखील आपल्या जीवनशैलीचे भाग बनवावे, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे. सूर्यनमस्कार करण्याबाबत वर्षानुवर्षांचे सातत्य आणि योग्य मार्गदर्शन हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सूर्यनमस्कार दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांमध्ये, सामाजिक संस्थांतर्फे सूर्यनमस्कार घालण्यात येत असतो. मोठ्या प्रमाणात त्याचे कार्यक्रम होत असतात. विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यात मोठ्या संख्येने सामील होतात. परंतु त्यात सातत्य ठेवणाऱ्यांचे प्रमाण एक टक्‍कादेखील नाही. खरे तर सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायामप्रकार आहे.

शरीराच्या बहुतांश भागाला त्यामुळे व्यायाम होतो. त्यासाठी प्राथमिक कौशल्य अवगत असणे आवश्‍यक असते. त्यामुळे प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर सातत्याने सूर्यनमस्कार केल्यास त्याचे प्रभावी परिणाम मिळविता येऊ शकतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून घरातील लहानांना सूर्यनमस्कारासाठी आग्रह केला जायचा. त्यांच्याकडून सूर्यनमस्कार करवून घेतला जायचा. परंतु ही परंपरा खंडित होताना दिसत आहे.

अनेक जण तंत्रशुद्धपणे सूर्यनमस्कार घालत नसल्याचेही निरीक्षण आहे. काही संस्थांकडून प्रशिक्षण देण्याचे काम केले जात असले, तरी त्यांच्यामार्फत आयोजित शिबिरांसाठी ज्येष्ठ नागरिक, व्याधी-विकार झालेली मंडळी मात्र मोठ्या संख्येने येत आहेत. युवकांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व ओळखून त्यात नियमितता ठेवायला हवी, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे.

सूर्यनमस्कारासाठी प्राथमिक कौशल्य असणे आवश्‍यक असते. विशेषत: तरुण वर्गाने हे कौशल्य आत्मसात करून सूर्यनमस्कारात सातत्य ठेवल्यास त्याचा त्यांना फायदा होईल. सद्यःस्थितीत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, व्याधी-विकार झालेल्या व्यक्‍तीच येत असतात. त्यांना वयाच्या उशिरा का होईना सुरू केलेल्या या व्यायामाने चांगले अनुभव येत आहेत.

- सुभाष खर्डेकर, संस्थापक अध्यक्ष, सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नाशिक

Web Title: Suryanamaskara to be part of life