सूर्यवंशींना आत्मदहनापासून रोखले; आश्रमशाळेचा वाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

धुळे - उडाणे (ता. धुळे) येथील आश्रमशाळेच्या जळितकांड प्रकरणातील संशयिताचे नाव समोर येऊनही त्याची तालुका पोलिस ठाणे पाठराखण करीत आहेत, असा आरोप करत या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुख्याध्यापक, धनगर संघटनेचे पदाधिकारी अण्णा विश्राम सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांच्या हातून रॉकेलचा डबा हिसकावून घेण्यात पोलिस कर्मचाऱ्यांना यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सूर्यवंशी यांनी म्हटले आहे, की इंदाईदेवी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक मंडळाची उडाणे येथे विजाभज प्राथमिक आश्रमशाळा आहे. या शाळेतील कामाठी जिभाऊ आनंदा पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या जागी पत्नीला स्वयंपाकी म्हणून नोकरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्यांचा मुलगा किशोर याने मलाच शाळेत सामावून घ्यावे, असा तगादा लावला. त्यास नकार दिला. त्याचा राग येऊन किशोरने दूरध्वनीवरून मला धमकी दिली. तत्पूर्वी, १० मे २०१६ ला शाळेचे कुलूप तोडून आग लावण्यात आली. त्यात शाळेचे विविध साहित्य, दस्तावेज जळाले व सरासरी ६० हजारांचे नुकसान झाले. 

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी किशोर जिभाऊ पाटीलला चौकशीसाठी बोलाविले. त्याचा राग आल्याने त्याने कुटुंबासह मला ठार मारण्याची धमकी दिली. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग पोलिसांना दिले व तपासणीअंती अनेक बाबींचा उलगडा झाला. तरीही तालुका पोलिस ठाणे न्याय कार्यवाही करत नसून मी अकरा महिन्यांपासून हेलपाटे मारत आहे. वेळोवेळी विविध प्रमुख अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्यायासाठी आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला. या प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी न्याय द्यावा, अशी मागणी पीडित सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली. 

तर उडी मारेल...
जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या करेन, असा इशारा सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

Web Title: suryavanshi Preventing from self-combustion