#TuesdayMotivation : सुशांतने शोधला सूर्याच्या शक्तीचा उगम

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

जळगावच्या सुशांतने अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. पदवी मिळवितानाच सूर्याच्या चुंबकीय शक्तीचा उगम नक्की कुठे होतो, याचा शोध घेतला आहे.

रावेर (जि. जळगाव) : इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यशोशिखरावर नक्कीच पोचता येते, याचे उदाहरण तांदलवाडी (ता. रावेर) येथील सुशांत महाजन याने घालून दिले आहे. सुशांतने अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. पदवी मिळवितानाच सूर्याच्या चुंबकीय शक्तीचा उगम नक्की कुठे होतो, याचा शोध घेतला आहे. 

सुशांतने बनारस हिंदू विद्यापीठातून एम.टेक पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षानंतरच उन्हाळ्याच्या सुटीत त्याने आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍण्ड रिसर्च) कोलकता येथे डॉ. दिव्येन्दू नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास सुरू केला. तिसऱ्या वर्षातील उन्हाळ्यात त्याला मॉन्टाना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिकेत हा अभ्यास आणखी सविस्तरपणे करण्याची संधी मिळाली. सुशांतने सूर्याच्या आत तयार होणाऱ्या ध्वनिलहरींचा अभ्यास करून सूर्याच्या चुंबकीय शक्तीचा उगम नक्की कुठे होतो, ते शोधून काढले. यासाठी त्याला डॉ. नंदी यांचे सहकार्य लाभले. 

इतर प्रकल्पांतही काम 
सुशांतने "नासा'मध्ये सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रवाह मोजण्याचे कामही केले. हे सूर्याच्या पृष्ठभागावरचे प्रवाह सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वर्तविण्यासाठी मदत करतात. सुशांतच्या प्रवाह मोजण्याच्या पद्धतीच्या आधारे तब्बल 6000 किलोमीटरवरून माणसाच्या एका केसाच्या रुंदीएवढी हालचालही मोजता येते. तसेच, हवाई बेटांवरील जगातील सर्वांत मोठ्या सौरदुर्बिणीवर काम करण्याचीही सुशांतला संधी मिळालेली आहे. 

संशोधनात सुशांतचे योगदान 
- सूर्य पृथ्वीकडे 10 लाख सेल्सिअस तापमान असलेला चुंबकीय गॅस 400 कि.मी. प्रतिसेकंद या वेगाने सोडू शकतो. तो गॅस जेव्हा पृथ्वीपर्यंत पोचतो तेव्हा पृथ्वीचे चुंबकीय कवच आपले रक्षण करते. 
- अंतराळवीर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर जातात, त्या वेळी सूर्यावर विस्फोट केव्हा होऊ शकतात ही माहिती अंतराळवीरांना पुरविण्यात सुशांतचेही योगदान असते. 
- चंद्र, मंगळावर मानव पाठविण्याच्या दृष्टीने सूर्यावरील स्फोटांचे असे बिनचूक अंदाज वर्तवण्याची क्षमता निर्माण करण्याच्या "नासा'च्या प्रयत्नांत सुशांतचा सहभाग. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Mahajan found origin of magnetic power of sun