Nandurbar News : अंगणवाडीसेविका आत्महत्येप्रकरणी संशयित मोकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nandurbar News : अंगणवाडीसेविका आत्महत्येप्रकरणी संशयित मोकाट

नंदुरबार : हिरणीचापाडा (ता. धडगाव) येथील अंगणवाडीसेविका आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपींना मोकाट सोडल्याने धडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. (Suspect in Anganwadi workers suicide case at large nandurbar crime news)

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

अंगणवाडीसेविका अलका वळवी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ विभागातील जुगणीच्या हिरणीचापाडा येथील रहिवासी केंद्रात अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत होती. तीन वर्षांपासून तिला कामाचा कोणताही मोबदला मिळाला नव्हता.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता. तसेच गावातील नागरिकांनाही तिच्याबद्दलची चिथावणी देऊन त्रास द्यायला लावला. अशा विविध त्रासामुळे कंटाळून दुचाकीवरून घरी जात असताना घाटात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी धडगाव प्रकल्प अधिकारी किशोर पगारे, रवीण हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रवीन वळवी, मालतीबाई दारासिंग वळवी या पाच जणांविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पंधरा दिवसांपासून पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत अटक करून कायदेशीर कारवाई केलेली नाही. आरोपींना पोलिसांनी अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाइकांकडून केली जात होती; परंतु पोलिस याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे गुरुवारी नातेवाइकांनी थेट नंदुरबार पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून मोर्चा काढत निवेदन सादर केले आहे.

निवेदनानंतर पोलिस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांना मिळालेला जामीनदेखील नामंजूर करू व आरोपींना अटक करू, अशी ग्वाही दिली. पोलिसांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पावरा यांनी दिला.

टॅग्स :Nandurbarcrimedeath