करंजखेड ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामसेवकास निलंबित करावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सटाणा - करंजखेड (ता.बागलाण) ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी भ्रष्टाचार करीत असून त्यांच्या मनमानीला सर्वसामान्य ग्रामस्थ कंटाळले आहे. प्रशासनाने ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे, अन्यथा येत्या ता.१९ जून रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा संतप्त इशारा करंजखेड ग्रामस्थांनी काल मंगळवार (ता.१२) रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.

सटाणा - करंजखेड (ता.बागलाण) ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी भ्रष्टाचार करीत असून त्यांच्या मनमानीला सर्वसामान्य ग्रामस्थ कंटाळले आहे. प्रशासनाने ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे, अन्यथा येत्या ता.१९ जून रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल, असा संतप्त इशारा करंजखेड ग्रामस्थांनी काल मंगळवार (ता.१२) रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी आज बागलाणचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, करंजखेड ग्रामपंचायत ही आता ग्रामपंचायत राहिलेली नसून भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झालेली आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामपंचायतीवर काही विशिष्ट लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सर्व गाव समस्याग्रस्त झाले असून ग्रामस्थ अडचणीत सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी शनिवार (ता.९) रोजी गावात ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे असा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला होता. मात्र ग्रामसेवकाने ठरावाबाबत बागलाण पंचायत समिती प्रशासनाला कोणतीही माहिती न देता ठरावाची प्रत दडवून ठेवली. ग्रामसेवक गेल्या तीन महिन्यांपासून फरार असून ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प आहे. याबाबत ठोस पुरावा देखील आहे. ग्रामसेवक नसल्याने शालेय दाखले, घरकुल, शौचालये आदी शासकीय योजनांसाठी दाखले मिळत नसल्याने गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. गावात राबविल्या जाणाऱ्या सर्व शासकीय योजनांमध्ये सरपंच, ग्रामसेवक व शिपाई यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे. गावात ग्रामसभा न घेता ग्रामस्थांना अंधारात ठेऊन अनेक ठराव परस्पर मंजूर करून घेतले आहेत. गावात कोणतेही काम न करता शासनाची फसवणूक करून शासकीय निधी वर्ग करून घेतला आहे. कोणताही ठराव न करता टेंडर न काढता आपल्या मर्जीतील ठेकेदारास शौचालयांचे काम दिले. मात्र शौचालयाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून यात भ्रष्टाचार झालेला आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानातून ग्रामस्थांना धान्य मिळत नाही. शौचालय व घरकुल योजनेसाठी सरपंच, ग्रामसेवक व शिपाई यांनी ग्रामस्थांकडून प्रत्येकी एक ते दोन हजार रुपये घेतले आहेत. सरपंच व शिपाई ग्रामपंचायत प्रशासनाची सरकारी मालमत्ता स्वत:च्या शेती व घरास्तही वापरत आहेत. गावाचे पोलीसपाटील हे सरपंच, ग्रामसेवक व शिपाई यांना पाठीशी घालत असून त्यांचेही पद रद्द करावे. हे सर्व आरोप खरे असून त्याबाबत सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. करंजखेड ग्रामस्थ या प्रकाराने त्रस्त झाले असून ग्रामपंचायतीच्या गैरकारभारामुळे ग्रामस्थांवर अन्याय होत आहे. ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ग्रामसेवकास निलंबित करावे आणि सरपंच, सदस्य, कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून ग्रामपंचायत बरखास्त करावी. शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर येत्या ता.१९ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन छेडण्यात येईल आणि बागलाण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा संतप्त इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनावर आत्माराम चौरे, दिनेश चौरे, दिलीप गवळी, काळु महाले, दत्तु देशमुख, लक्ष्मण देशमुख, राहुल गवळी, रमेश देशमुख, तुळशिराम चौरे, सुनिल बहिरम, काशिनाथ बहिरम, तानाजी सोनवणे, बाबुराव देशमुख, मोतीराम देशमुख, पांडुरंग चौरे, राजराम पवार, अनिल सोनवणे, शिवाजी चौरे, भावडू देशमुख, केदा देशमुख, रमेश देशमुख, केदा देशमुख, जगन महाले, शरद चौरे, योगेश गवळी, पंढरीनाथ सोनवणे, पोपट चौरे आदींसह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व राज्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Web Title: suspend Karanjkhed Gram Panchayat and the GramSewak