साक्री, नवापुर, नंदुरबार आगाराच्या चार चालकांवर निलंबनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सटाणा : सटाणा शहर व तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरून (क्रमांक 752 जी) भरधाव वेगाने बेशिस्तरित्या बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री, नवापुर व नंदुरबार आगारातील चार चालकांवर शासनातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आज गुरुवार (ता. 29) रोजी सांगितले, अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

याबाबत बोलताना आमदार चव्हाण म्हणाल्या, बागलाण विधानसभा मतदारसंघातून खेतीया – नंदुरबार – विसरवाडी – साक्री – पिंपळनेर – ताहाराबाद – सटाणा – देवळा – भावडबारी – चांदवड – शिर्डी ते चिकोटी या मार्गासह मध्यप्रदेश ते कर्नाटक राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे महामार्गावर दररोज मोठी वाहतूक असते. राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री, नवापुर व नंदुरबार आगारातील शेकडो एस. टी. बसेस नाशिक, पुणे, मुंबईकडे या महामार्गावरून ये – जा करतात. मात्र या आगारातील चालक अत्यंत भरधाव वेगाने बसेस चालवत असल्याने अनेक अपघात घडले आहेत. आजपर्यंत झालेल्या अनेक भीषण अपघातात शेकडो निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आले आहे.

ऑगस्ट 2018 दरम्यान साक्री, नवापुर व नंदुरबार आगाराच्या बसेसचे चार ते पाच ठिकाणी भीषण अपघात झाले होते. या पार्श्वभूमीवर (ता. 19) सप्टेंबर रोजी या बेशिस्तपणे बसेस चालविणार्‍या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देखील केली होती. विधानसभेत याप्रश्नी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री रावते यांनी संबंधित आगाराच्या चार चालकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळाद्वारे विविध उपाययोजना राबविल्या जात असून चालक उजळणी प्रशिक्षण, ज्या चालकांकडून अपघात घडला आहे अशा चालकांचे विशेष प्रशिक्षण, चालकांची नियमित आरोग्य व नेत्र तपासणी केली जाते. तसेच विना अपघात सेवेबाबत चालकांना प्रोत्साहनपर बक्षिसे, बिल्ले दिली जातात. सुरक्षितता मोहीम राबवून चालकांचे प्रबोधन करून त्यांच्यामध्ये जागरूकता देखील निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे श्री. रावते यांनी उत्तरात सांगितले आहे, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: suspension of 4 drivers from sakri navapur nandurbar st depot