मोहाडीतील तरुणीचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

धुळे - येथील मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीलगत विहिरीत आज दुपारी अठरावर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की हत्या, ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले असून, चौकशीअंती घटनेमागचा नेमका उलगडा होऊ शकेल. दरम्यान, निकिता विठ्ठल गावडे (वय 18) असे तिचे नाव असून, ती जयहिंद महाविद्यालयात बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती.

धुळे - येथील मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीलगत विहिरीत आज दुपारी अठरावर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की हत्या, ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतले असून, चौकशीअंती घटनेमागचा नेमका उलगडा होऊ शकेल. दरम्यान, निकिता विठ्ठल गावडे (वय 18) असे तिचे नाव असून, ती जयहिंद महाविद्यालयात बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती.

निकिता काल (ता. 13) पहाटे घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांकडून शोध सुरू होता. "मोबाईल लोकेशनद्वारे' शोध घेतल्यानंतर परिसरातील एका विहिरीजवळच ते आढळल्याने व तेथेच तिची दुचाकीही दिसल्याने शोध सुरू झाला. विहिरीत तिचा मृतदेहच आढळल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. काल पहाटे पाचच्या सुमारास क्‍लासला जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतली नाही. वडील विठ्ठल गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मोहाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात निकिताच्या मोबाईलचे लोकेशन घेतले.

मोबाईल लोकेशनने तपास
मोहाडी येथील जुन्या पोलिस ठाण्याजवळ रानमळा रोडलगत विलास शिंदे यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या वाड्याजवळ निकिताचे मोबाईल लोकेशन आढळले. पोलिसांनी धाव घेत तिचा शोध घेतला असता वाड्यातील विहिरीजवळ निकिताची दुचाकी आढळली. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी परिसरातील काहींच्या मदतीने तरुणीचा परिसरात व विहिरीत शोध सुरू केला. विहिरीत तिचा मृतदेह आढळला. दोन ते अडीच तासांनंतर दुपारी चारला निकिताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

नागरिकांची गर्दी
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मोहाडीसह परिसरातील नागरिक, महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेह विहिरीबाहेर काढण्यातही अडचणी येत होत्या. खाटेला दोर बांधून ती विहिरीत सोडली. विहिरीतून दोन ते तीन जणांनी तरुणीचा मृतदेह खाटेच्या सहाय्याने बाहेर काढला. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर शहरातील जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला.

नातेवाइकांचा आक्रोश
गावडे कुटुंबीयांसह नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. निकिताचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत संबंधितांचा पोलिसांनी शोध घेऊन तत्काळ अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमतराव जाधव यांच्यासह पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढून कारवाईचे आश्‍वासन दिले. उद्या (ता. 15) सकाळी मृतदेह कुटुंबीयांकडून ताब्यात घेण्यात येईल.

चार संशयित ताब्यात
उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी स्वतः लक्ष घालून मोहाडी पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांनी तपासाला वेग देत मोहाडी येथील चार जणांना ताब्यात घेतले. घराबाहेर पडताना निकिताच्या मोबाईलवर एका तरुणाचा कॉल आला होता. तो कॉल करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी चौकशी केली. त्याने अन्य तिघांची नावे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. जे. शिंदे तपास करीत आहेत.

ब्लॅकमेलिंगचा प्रकार?
निकिता घराबाहेर पडली त्यानंतर तिच्या मैत्रिणीच्या भावाचा तिच्याशी संपर्क झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलिस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. दुसरीकडे काहींनी ब्लॅकमेलिंग केली असावे, त्याला नकार दिल्याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला असावा, अशीही उलटसुलट चर्चा सुरू आहे. चौकशीअंती घटनेमागचा उलगडा होऊ शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of a young woman