स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात नाशिक चर्चेत

शुक्रवार, 12 जुलै 2019

भविष्यात प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राज्यातील तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. या वेळी वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या वर्षात जानेवारीपासून दीडशे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने ही आकडेवारी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ठरली आहे. पावसाळ्यात डेंगी, तर पावसाळा संपल्यानंतर हिवाळा येत असतानाच स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढत असल्याचे काही वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नाशिक - एरवी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवतो. परंतु या वर्षात पहिल्या सहामाहीमध्येच नाशिकला स्वाइन फ्लूचा विळखा पडल्याचे राज्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

भविष्यात प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राज्यातील तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. या वेळी वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या वर्षात जानेवारीपासून दीडशे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने ही आकडेवारी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ठरली आहे. पावसाळ्यात डेंगी, तर पावसाळा संपल्यानंतर हिवाळा येत असतानाच स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढत असल्याचे काही वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दर वर्षी आलटून-पालटून स्वाइन फ्लू, तर कधी डेंगीचा प्रादुर्भाव वाढतो. गेल्या वर्षी मुंबईला स्वाइन फ्लूने ग्रासले होते. यंदा नाशिक स्वाइन फ्लूच्या रडारवर आहे. जानेवारीत सहा, फेब्रुवारीत ४२, मार्चमध्ये ५०, एप्रिलमध्ये ३७, मेमध्ये ११, जूनमध्ये तीन, तर जुलैत एक रुग्ण आढळला. त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी अवघा एक स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूची साथ येते. यंदा ती लवकर आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाल्याने राज्यातही नाशिकचा स्वाइन फ्लू चर्चेत आला आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या पथकाकडून तातडीने कार्यशाळा बोलाविली आहे. शुक्रवारी (ता.१२) सकाळी अकराला आयएमए सभागृहात कार्यशाळा होईल. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्‍टर यांच्यासाठी ही कार्यशाळा आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, राज्य साथरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे, सहसंचालक डॉ. भोई मार्गदर्शन करतील.