अभ्यासक्रम मान्यता रद्दवरून "यूजीसी'चे घूमजाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 17 अभ्यासक्रमांना केंद्रीय अनुदान आयोगाने (यूजीसी) नकार दिल्याने त्याचा फटका तीन लाख विद्यार्थ्यांना बसला असल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले. त्यावर आज आयोगाने मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द केलेले नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठातर्फे प्रसिद्धीला देण्यात आले आहे. यामुळे "यूजीसी'ने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरातील दूरस्थ शिक्षण पद्धतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रम प्रस्ताव छाननीमध्ये ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील, त्या त्रुटी भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार असल्याचे "यूजीसी'ने म्हटले आहे. यूजीसीने हे पत्र मुक्त विद्यापीठांना पाठवले असून, ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठालाही मिळाले आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

16 ऑगस्टला प्रसिद्धीकरण
इतर अभ्यासक्रम व आनुषंगिक माहिती 16 ऑगस्टला आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतरही काही अभ्यासक्रमांबाबतीत शंका असल्यास आयोगाकडे नियमानुसार दाद मागता येणार असल्याची बाब "यूजीसी'ने अधोरेखित केली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी म्हटले आहे.

यूजीसी आणि शिक्षणाचा खेळखंडोबा केंद्र व राज्य सरकारकडून चालला आहे. आता "यूजीसी'चे स्वरूप बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे, त्यामुळे कुणाला काही समजत नाही.
- पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)

Web Title: Syllabus Permission Cancel UGC