टॅब्लेटद्वारे "लर्निंग लायसन्स'चा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

नाशिक - नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ग्रामीण भागातील शिबिरांसाठी राबविण्यात येत असलेल्या टॅब्लेट (टॅब) चाचणी प्रणालीचा प्रयोग राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रयोग ठरणार आहे. 

नाशिक - नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ग्रामीण भागातील शिबिरांसाठी राबविण्यात येत असलेल्या टॅब्लेट (टॅब) चाचणी प्रणालीचा प्रयोग राज्यातील अन्य जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रयोग ठरणार आहे. 

परिवहन कार्यालयाने या प्रणालीसंदर्भातील अहवाल नाशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडून मागविला आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात होणाऱ्या शिबिरात टॅब्लेटद्वारे चाचणी घेऊन प्रशिक्षण परवाना (लर्निंग लायसन्स) देण्याची व्यवस्था करीत व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण केली. राज्यात 2003 मध्ये प्रथम संगणक प्रणालीद्वारे लर्निंग लायसन्सचा पथदर्शी प्रकल्प नाशिक आरटीओतर्फे राबविण्यात आला होता. यानंतर राज्यभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये संगणक प्रणालीद्वारे लर्निंग लायसन्ससाठी चाचणी घेतली जाऊ लागली. बहुतांश शहरांमध्ये आता संगणकप्रणालीद्वारेच लर्निंग लायसन्सची चाचणी घेतली जाते. 

ग्रामीण भागात मात्र संगणक यंत्रणा उपलब्ध करणे अशक्‍य होते. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या शिबिरांमध्ये तोंडी चाचणी घेऊन निरीक्षकाकडून अर्जदाराला लर्निंग लायसन्स दिले जात होते. या पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी नाशिक आरटीओतर्फे शिबिरांमध्ये टॅब्लेटद्वारे चाचणी घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. येत्या 1 जुलैपासून ग्रामीण भागात टॅब्लेटद्वारेच सक्‍तीने लर्निंग लायसन्सची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी दहा टॅब्लेट उपलब्ध करून देण्यात आले असून, लवकरच आणखी पाच टॅब्लेट उपलब्ध करून दिले जातील. हा प्रकल्प प्रायोजकांच्या सहकार्याने राबविला जात असल्याने सरकारवर याचा आर्थिक भार आलेला नाही. 

ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये टॅब्लेटद्वारे लर्निंग लायसन्ससाठी चाचणी घेण्यामागे पारदर्शकता आणण्याचा हेतू आहे. अंमलबजावणीपूर्वी घेतलेल्या चाचणीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पासंदर्भातील अहवाल परिवहन कार्यालयातर्फे मागविला असून, हा अभिनव उपक्रम राज्यासाठी उपयुक्‍त ठरेल. 

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: 'Tablet' learning licence experiment