'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

आमदार सौ. चव्हाण यांनी औचित्याच्या मुद्द्यात, गेल्या दीड वर्षांपासून बागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसिलदार नसल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रेंगाळली आहेत. बागलाण हा आदीवासीबहुल तालुका असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे मोठे आहे. १७१ ग्रामपंचायतींचा कारभार असल्यामुळे या भागातील नागरिकांची विविध प्रकारची कामे तहसीलदारांअभावी प्रलंबित आहेत.

सटाणा  : 'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?' गेल्या दीड वर्षांपासून तहसीलदाराविना पोरक्या झालेल्या बागलाण तालुक्यास 'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?' अशी घोषणाबाजी करत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल शुक्रवार (ता.१३) रोजी नागपूर विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. तर थेट विधानसभेत याप्रश्नी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत शासनाला धारेवर धरले. येत्या आठ दिवसात तालुक्यासाठी कायमस्वरूपी तहसीलदारांची नियुक्ती न केल्यास विधीमंडळाच्या पायरीवर बसून बेमुदत उपोषण करणार असल्याचा संतप्त इशाराही आमदार सौ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे आज दिला.

आमदार सौ. चव्हाण यांनी औचित्याच्या मुद्द्यात, गेल्या दीड वर्षांपासून बागलाण तालुक्याला कायमस्वरूपी तहसिलदार नसल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अनेक शासकीय कामे रेंगाळली आहेत. बागलाण हा आदीवासीबहुल तालुका असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हे मोठे आहे. १७१ ग्रामपंचायतींचा कारभार असल्यामुळे या भागातील नागरिकांची विविध प्रकारची कामे तहसीलदारांअभावी प्रलंबित आहेत. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने विद्यार्थांना लागणारे विविध दाखले, शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले, पाणीटंचाई, गौण खनिज, कुळ कायद्याची प्रकरणे यासारखी अनेक कामे रखडल्याने जनतेमध्ये शासनविरोधी भावना आहे. बागलाण तालुक्यास कायमस्वरूपी तहसिलदार मिळावा यासाठी अनेक पक्ष - संघटनांनी आंदोलने केलेली आहेत. याप्रश्नी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन यांची वारंवार भेट घेऊन तसेच पत्रव्यवहार करून आग्रही मागणी केली आहे. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असेही आमदार सौ. चव्हाण यांनी नमूद केले आहे.

यानंतर आज दुपारी आमदार दिपीका चव्हाण यांनी आमदार अमिता अशोक चव्हाण, आमदार संध्या कुपेकर, आमदार ज्योती कलाणी यांना सोबत घेवून विधानभवनाच्या पायऱ्यांवर देवमामलेदारांचा फोटो असलेले आणि वृत्तपत्रांतील बातम्यांची कात्रणे असलेले बॅनर झळकाविले आणि बागलाण तालुक्याला 'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?' अशी घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले. आमदार सौ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी तहसिलदार न मिळाल्यास विधानभवनाच्या पायरींवरच उपोषण करण्याचा इशारा आमदार सौ. चव्हाण यांनी निवेदनात दिला आहे.

Web Title: Tahsildar for baglan tehsil