कपाशीला ब्रेक, तर कांद्यासह मका, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार  

संतोष विंचू
गुरुवार, 14 जून 2018

येवला : खरिप हंगामावर अवलंबून असलेल्या अवर्षणप्रवण तालुक्यात या वेळी शेतकऱ्यांनी पीक पॅटर्न बदलण्याचे नियोजन केले आहे. कपाशीला मागे सारून तेजीतील कांद्यासह मका, सोयाबीन व भुईमूगाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे दिसते. मात्र हुलकावणी देणाऱ्या पावसाने या नियोजनाला खोडा घातला असून यामुळे बाजारपेठ देखील थंडावलेलीच आहे.

येवला : खरिप हंगामावर अवलंबून असलेल्या अवर्षणप्रवण तालुक्यात या वेळी शेतकऱ्यांनी पीक पॅटर्न बदलण्याचे नियोजन केले आहे. कपाशीला मागे सारून तेजीतील कांद्यासह मका, सोयाबीन व भुईमूगाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे दिसते. मात्र हुलकावणी देणाऱ्या पावसाने या नियोजनाला खोडा घातला असून यामुळे बाजारपेठ देखील थंडावलेलीच आहे.

कांद्याचे आगार असलेल्या या तालुक्यात मागील काही वर्षात मका, कपाशीसह नगदी भाजीपाल्याकडे शेतकरी वळत आहेत. मागील वर्षी लालसह उन्हाळ कांद्याला सलग सहा महिन्यावर भावात तेजी राहिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांदे लागवडीला प्राधान्य देणार असल्याचे दिसते.यासाठी बियाणे खरेदी करून रोपांची तयारीही केली गेली आहे.

याशिवाय शेतकरी मका व सोयाबीन या पिकाकडे अधिक वळणार असल्याचे चित्र आहे.तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीचे क्षेत्र ९ टक्के घटणार आहे.बोंडअळीने केलेले नुकसान व बाजारभावातील मंदीने झालेले नुकसान शेतकऱ्यांना पचलेले नाही. तर तुरीचा वाईट अनुभव पाठीशी असल्याने यंदा देखील याकडे शेतकरी कानाडोळा करणार असल्याचे दिसते.याउलट मका,उडीद,सोयाबीन,भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण कक्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टरवर असून यात वाढ होत ६७ हजार ९२४ हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे.यापैकी आज पर्यंत मका व कपाशीची अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा पावसाचे रोहिणी पाठोपाठ हक्काचे मृग नक्षत्रदेखील कोरडे चालले असून जुनचा दुसरा आठवडा संपत आला पण मात्र अद्याप जोरदार पावसाचे आगमन झालेले नाही.जूनच्या सुरुवातीला वादळी पावसाने हजेरी लावत चाहूल लावली पण नतर रोजच वारे वाहत असून कोरडेठाक दिसणारे ठग चिंता वाढवत आहेत.अद्यापही बंध्रारे,विहिरी,कुपनलिका कोरड्याठाक आहे.पिण्याच्या पाण्याची हाल पण सुरूच असून पाऊस पडत नसल्याने पेरणीला खोडा बसला असून पावसाच्या हुलकावणीने बळीराजा चिंतातुर झाला आहे.

आकाश कोरडे..बाजारपेठ सुनीसुनी...
तालुक्याची पर्ज्यन्याची वार्षिक सरासरी केवळ ४८९ मिलिमीटर असून पावसाळा संपत येतो तेव्हा कुठे आकडे जवळपास पोहोचतात.वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण तालुका हि ओळख असलेला हा तालुका राज्यातील सर्वाधिक कमी पाऊस असलेल्या यादीत आहे.अशीच स्थिती दर वर्षाआड येथे राहत असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहेत.यंदा  पावसाने दडी मारल्याने बाजारपेठ थंड पडलेली असून बियाणे विक्रीच्या दुकानांवर बियाणे खरेदी अद्याप सुरु झालेली नसल्याचे चित्र आहे.शेतकरी बियाण्यांचे वान पाहत आहेत असले तरी खरेदीविषयी अनस्था आहे.मृग नक्षत्र लागूनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी सावध राहून प्रतीक्षा करतांना दिसत आहे.पावसाविषयी शेतकरी विविध अंदाज बांधत आज नाही तर उद्या येईल,हि भाबडी आस धरून आहे.

अशी होईल पेरणी..
पिक    सर्वसाधारण क्षेत्र -- प्रस्तावित क्षेत्र
ज्वारी -      २२८४    --      ००
बाजरी -   १२५११    ---   ९३२५
मका -   १७२६०   ---    ३३६७०
तूर -       ९१२    ---       १६५७
मूग - २०५७ --- ३७०१
उडीद - ४०० --- ८९०
भुईमुग - १६२० --- ३२५०
सुर्यफुल - २५ --- ००
सोयाबीन - २९७४ --- ३५१४
कापूस  - १२८९७  --- ११८९७
ऊस  - ८००  --      २०
एकूण - ५४२३३  - ६७९२४

Web Title: taking large number of crops of onion maize and soyabin instead of cotton