शिक्षकभरतीला मुहूर्त कधी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

तळेगाव - येत्या सहा महिन्यांत राज्यात 24 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यामुळे राज्यभरातील लाखो बेरोजगार डी.एड. आणि बी.एड.धारक उमेदवारांच्या नोकरीची आशा पुन्हा पल्लवित झाली असून, या वेळी तरी शिक्षणमंत्र्यांची घोषणा प्रत्यक्षात यावी, अशी अपेक्षा राज्यातील लाखो बेरोजगार डी.एड. आणि बी.एड.धारक बाळगून आहेत.

गेल्या काही वर्षांतील परिस्थिती पाहता शिक्षकभरती होणार असल्याची मंत्रिमहोदयांची घोषणा कितपत खरी ठरते याविषयी डी.एड. आणि बी.एड.धारक अजून तरी साशंक असल्याचे चित्र आहे. राज्यात शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदीचा आधार घेत 2014 पासून शिक्षकभरती प्रक्रियेसाठी आवश्‍यक पात्रतेत "शिक्षक पात्रता चाचणी' (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याची अट घालण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत दर वर्षी टीईटी परीक्षा घेतली जाते. मात्र 2013 पासून आजतागायत राज्यात शिक्षकभरती प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुद्धा उमेदवारांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही अभियोग्यता चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. अभियोग्यता चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच नियुक्तीसाठी विचार केला जाणार असल्याने नियुक्तीसाठी या अभियोग्यता चाचणीच्या रूपात अजून एक चाळण लागणार आहे. मात्र हे सगळे सुरू असताना शिक्षकभरती नक्की कधी होणार हे अजूनही गुलदस्तात आहे.

"अतिरिक्त'ची टांगती तलवार
चोवीस हजार जागांसाठी शिक्षकभरती होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले असले, तरी सध्या कार्यरत शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न गंभीर आहे. रिक्त जागा भरताना सध्या कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्राधान्याने करावे लागणार आहे. त्यामुळे समायोजन झाल्याच्या नंतरच रिक्त जागांची संख्या ठरविता येणार असल्याने नवीन शिक्षकभरतीला पुन्हा एकदा "अतिरिक्त'चा "ब्रेक' लागण्याची शक्‍यता आहे.

Web Title: talegaon news nashik news teacher recruitment muhurt