esakal | वन्यप्राण्यांपासून बचावासाठी तळोद्यातील तरुणाने तयार केली 'फार्म गन'
sakal

बोलून बातमी शोधा

In Taloda, a young man has developed a farm gun to protect himself from wildlife 2.jpg

ही गन शेतकऱ्यांना, मजुरांना संकटसमयी उपयोगी पडणार आहे. गन बनविण्यासाठी केवळ 300 रुपये खर्च आला आहे. अनोख्या व अंत्यत सोप्या पद्धतीने निर्माण केलेल्या या गनची शेतकऱ्यांमध्ये कुतूहल युक्त चर्चा होत आहे.

वन्यप्राण्यांपासून बचावासाठी तळोद्यातील तरुणाने तयार केली 'फार्म गन'

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार ) :  शेतकऱ्यांना आणि शेत मजुरांना शेतात रात्री अपरात्री जावे लागत असल्याने वन्यप्राण्यांपासून बचावासाठी तळोद्यातील तरुणाने 'फार्म गन' तयार केली आहे. ही गन शेतकऱ्यांना, मजुरांना संकटसमयी उपयोगी पडणार आहे. गन बनविण्यासाठी केवळ 300 रुपये खर्च आला आहे. अनोख्या व अंत्यत सोप्या पद्धतीने निर्माण केलेल्या या गनची शेतकऱ्यांमध्ये कुतूहल युक्त चर्चा होत आहे.

हे ही वाचा : पालकांनो सावधान..चिमुकले अंगणात खेळताय तर; एकीचा घेतला बळी

वन्य प्राण्यांपासून बचावासाठी गनची निर्मिती

तळोदा शहरा लगतच्या परिसरात तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अलीकडच्या काळात रात्री-अपरात्री शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना, मजुरांना वन्य प्राण्यांनी विशेषतः बिबट्यांनी अनेकदा दर्शन दिले आहे. असंख्य कुत्रे, डुकरे, शेळ्या, पारडू यांना देखील बिबट्याने आपले लक्ष केले आहे. इतकेच काय तर काही दिवसांपूर्वी चिनोदा परिसरातील एका शेतात अचानक समोर आलेल्या तीन बिबट्यामुळे तळोदयातील रुपसिंग पाडवी व त्यांचा नातलगांना झाडावर चढून आपला जीव वाचवावा लागल्याची घटना घडली आहे.

तसेच अस्वल व इतर वन्य प्राण्यांनी देखील अनेकदा नागरिकांवर हल्ले करीत त्यांना गंभीर जखमी केले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात काही वेळा तर नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्य प्राणी विशेषतः बिबट्याची मोठी दहशत बसली आहे. यांवर उपाय म्हणून येथील गणेश बत्तीसे (वय 30) या युवकाने एका 'फार्म गन' ची निर्मिती केली आहे.

अत्यल्प खर्चात गन तयार

सदर गन तयार करण्यासाठी फक्त 300 रुपये खर्च आला आहे. गन तयार करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर करण्यात आला आहे. एका अडीच इंच पाईपला एक कॅप बसवली असून त्याच्यापुढे अडीच बाय दोनचा कपलर बसवला आहे व त्याला दीड फूटचा दोन इंच पाईप बसवला आहे आणि अडीच इंच पाईपला पुढे एक छिद्रं पाडण्यात आहे आहे.

आवाजामुळे प्राणी पळविण्यास होते मदत 

गन मधून आवाज काढण्यासाठी साधारणतः एखाद्या गोटी एवढं कार्पेट व थोडं पाणी त्यात टाकावे लागते. त्यानंतर गॅस लाईटर छिद्रांत टाकून पेटवल्यावर त्या गनमध्ये गॅस तयार होत स्फोट होत, आवाजाची निर्मिती होते. या आवाजामुळे वन्य प्राणी पळवून शेतकरी, मजूर स्वतःचा बचाव करु शकतात.

हे ही वाचा : पोलिस प्रशासनाची तत्‍परता; नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक 

फार्म गनची वैशिष्ट्ये 

● अत्यंत कमी खर्चात व कोणालाही सहज बनविणे शक्य.
● मेंटेनन्स खर्च शून्य.
● सहजपणे कोणीही जवळ बाळगून गनला हाताळू शकते.

तळोदा व लगतच्या परिसरातील शेतकरी, मजुरांना वन्य प्राणी विशेषतः बिबट्याचा अचानकपणे अनेकदा सामना करावा लागला आहे. मला सुध्दा शेतात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी एखादे उपकरण किंवा मशीन तयार करण्याचे मी ठरविले व त्यानुसार फार्म गन तयार केली.
- गणेश बत्तीसे, फार्म गनचा निर्माता.

संपादन - सुस्मिता वडतिले