डॉ. तांबेंनी रोखला भाजप लाटेचा वारू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

काय घडलं अन्‌ बिघडलं

  1. मंत्री, खासदार, आमदार, सत्ता अशा शक्तीस्थानातही भाजप उमेदवारांच्या एकाकीपणाचे घडले दर्शन
  2. नोटाबंदी सामान्यांना भावल्याचा टाहो नगरपालिकांच्या यशामुळे फोडणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांसह नेत्यांना चपराक
  3. शिक्षण संस्थांना भ्रष्टाचार आरोपांच्या घेऱ्यात गुंतवण्याचा प्रकार आला अंगलट
  4. शिक्षकांचे पेन्शनविषयक परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की ओढावली सरकारवर
  5. शिक्षणविषयक सतत बदलणाऱ्या धोरणांना पूर्णविराम मिळण्याची अपेक्षा ठरली फोल
  6. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या शिक्षण संस्थाचालक, शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना चर्चेचा नाही मिळाला फायदा
  7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसह शिर्डीमध्ये घेतलेल्या बैठकीनंतरही भाजपची सुधारली नाही स्थिती
  8. डॉ. सुधीर तांबे यांना स्वतःची यंत्रणा आणि तरुणांचा प्रतिसाद याचा झाला फायदा
  9. 1 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज न भरल्यास मिळणार नाही नाशिकमध्ये "ए-बी फॉर्म' याचाच भाजपला पडला विसर
  10. डॉ. सुधीर तांबे यांनी 6 महिन्यापासून तयारी करत अखेरच्या टप्प्यात डॉ. प्रशांत पाटील यांना गुंतवले नाशिकमध्ये

नाशिक : नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील 55 तालुके. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह 6 खासदार अन्‌ 22 आमदार. त्यास जोडीला केंद्रासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार. अशाही परिस्थितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी- टीडीएफ आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयाची हॅट्‌ट्रीक केली.

उमेदवारी अर्ज भरण्यापासून भाजप नेत्यांचा "इव्हेन्ट मॅनेजमेंट'चा देखावा राहिलेला असतानाच व्यक्तिगत संपर्काच्या जोरावर डॉ. तांबे यांनी भाजप लाटेचा वारु रोखला.
भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील हे डॉ. भामरे यांचे जावई. ही ओळख एकीकडे असतानाच डॉ. पाटील यांच्या रुपाने भाजपला "कोरी पाटी' तीही स्वच्छ प्रतिमेची मिळाली होती. त्यातच पुन्हा मतदारसंघातील 30 हजार बोगस मते रद्द झाल्याने ही निवडणूक एकापातळीवर आल्याची हाकाटी भाजपच्या मंत्र्यांसह नेत्यांनी पिटली. पण निवडणूक टप्प्याटप्प्याने पुढे निघाली तशी डॉ. पाटील आणि डॉ. भामरे यांची एकाकी लढत होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली होती. "बुथ'निहाय रचना कागदोपत्री लावलेल्या भाजपला बऱ्याच मतदार केंद्रापर्यंत दुपारपर्यंत प्रतिनिधी पोचवता आले नाहीत. हे कमी काय म्हणून "हंड्रेड प्लस'चा नारा देत नाशिक महापालिका एकहाती जिंकण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे लपून राहिले नाही. अगोदर मंत्रीमंडळातून वगळण्यात आल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी भाजपला विशेषतः जळगावमध्ये भोवणार हे दिसत होते. मतमोजणीचा कल स्पष्ट होण्यास सुरवात होताच, डॉ. तांबे यांनी 70 ः 30 या प्रमाणात मते घेतल्याची माहिती धडकताच, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरवात केली. मताधिक्‍याचा आकडा वाढत निघाला तसे स्मितहास्य करत डॉ. पाटील यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून बाहेर पडणे पसंत केले.
 

राजकीय दोलायमानता
कॉंग्रेससह टी. डी. एफ. तर्फे डॉ. तांबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत असताना राष्ट्रवादीतर्फे तांबे कुटुंबियांशी नातेसंबंधातील संग्राम कोते-पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा पुढे आली. पण शिवसेना-भाजपमधील बेबनावाच्या पार्श्‍वभूमीवर विधानपरिषदेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकोप्याचे वारे वाहू लागले. औरंगाबादच्या बदल्यात राष्ट्रवादीचे समर्थन डॉ. तांबे यांना मिळण्याचे चित्र स्पष्ट झाले. हे कमी काय म्हणून युतीमधील "ब्रेक-अप' कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला. डॉ. तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरताना विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असा विश्‍वास दिल्याने विशेषतः नगरमधील कॉंग्रेसमधील वादावर पडदा पडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरीश पटेल, माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख यांच्यासह शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेत्तरांचे पाठबळ मिळालेले डॉ. तांबे यांना विजयानंतर शिवसेनेतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे काय? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यास उत्तर देताना डॉ. तांबे यांनी राजकीय अभिन्वेष न ठेवता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जवळीक असल्याने त्यांचेही आभार मानावे लागतील अशी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.

दिवंगत नानासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेची जागा जिंकली होती. ही परंपरा प्रा. ना. स. फरांदे यांनी पुढे नेली. माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी ही जागा पुन्हा भाजपला मिळवून दिली. श्री. सोनवणे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्याने राजीनामा दिला. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. तांबे यांनी या मतदारसंघात प्रवेश केला. तेंव्हापासून त्यांनी आजवर विरोधकांना जवळ देखील येऊ दिलेले नाही. उलटपक्षी आजवरच्या तीन निवडणुकीत मताधिक्‍याचा आलेख उंचावत नेला. नंदूरबारमधून 62.08, धुळ्यातून 61.39, जळगावमधून 58.01, नगरमधून 56.61, नाशिकमधून 48.05 टक्के मतदान झाले. नगरपेक्षा नाशिकमध्ये दहा हजारांहून अधिक मतदान असतानाही 8 टक्‍क्‍यांहून कमी मतदान नाशिकमध्ये झाले. केवळ ही बाब भाजपच्या गोटामध्ये मतमोजणीच्या आदल्यादिवशी चिंतेचा विषय बनला होता.

आजवरच्या निवडणुकीचा कल

2009 (पोटनिवडणूक)
एकुण मतदान ः 2 लाख 13 हजार 580. झालेले मतदान- 93 हजार 976
- डॉ. सुधीर तांबे (अपक्ष) ः 42 हजार 251 मते (8 हजार 923 मतांनी विजय)
- प्रसाद हिरे (भाजप-सेना) ः 32 हजार 428 मते

2010 सार्वत्रिक निवडणूक
एकुण मतदान ः 2 लाख 63 हजार 03. झालेले मतदान- 1 लाख 6 हजार 734
- डॉ. सुधीर तांबे (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) ः 67 हजार 178 मते (31 हजार 390 मतांनी विजयी)
- प्रा. सुहास फरांदे (भाजप-सेना) ः 35 हजार 788 मते
(विजयासाठी 31 हजार 390 मतांचा कोटा. डॉ. तांबेंनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये केला पूर्ण)
 

2017 सार्वत्रिक निवडणूक
एकुण मतदान ः 2 लाख 56 हजार 472. झालेले मतदान- 1 लाख 43 हजार 876
- डॉ. सुधीर तांबे (कॉंग्रेस-राष्ट्रवादी-टीडीएफ) ः 83 हजार 311 मते (42 हजार 825 मतांनी विजयी)
- डॉ. प्रशांत पाटील (भाजप) ः 40 हजार 486 मते
(विजयासाठी 64 हजार 206 मतांचा कोटा. डॉ. तांबेंनी चौथ्या फेरीअखेर केला पूर्ण)

Web Title: tambe wins polls with putting curb on bjp