'तनिष्का डॉक्‍टर्स फोरम'च्या वैद्यकीय सेवेसाठी सामाजिक बांधिलकी

विजयकुमार इंगळे
गुरुवार, 18 मे 2017

नाशिक - 'सकाळ- तनिष्का' व्यासपीठातर्फे महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले जाताहेत. दोन वर्षांत राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात केवळ उद्योग-व्यवसाय यावरच नाही, तर महिलांच्या आरोग्यासाठीही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून नाशिकच्या "तनिष्का डॉक्‍टर्स फोरम'तर्फे त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील आदिवासी गावे दत्तक घेऊन या गावांत गेल्या दोन वर्षांपासून मोफत वैद्यकीय सेवा दिली जातेय. या उपक्रमाची दखल घेत नाशिकच्या श्री मालतीमाधव ट्रस्टने या गावांसाठी सेवा देणाऱ्या तनिष्कांसाठी मोफत चारचाकी वाहन उपलब्ध करून दिल्याने या परिसरातील गावांना ही सेवा अधिक चांगल्या गतीने देण्यास मदत होणार आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक महिला "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा' अभियानांतर्गत पुढे सरसावत आहेत. विविध उपक्रम राबवत आहेत. मात्र, हे उपक्रम राबवितानाच एक अनुकरणीय कार्य तनिष्का व्यासपीठामार्फत उभे राहतेय. सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून या ट्रस्टने तनिष्कांच्या सामाजिक कार्याला मोठे पाठबळ या निमित्ताने दिले आहे. नाशिकच्या श्री मालतीमाधव ट्रस्टतर्फे "तनिष्का डॉक्‍टर्स फोरम'ला मोफत वैद्यकीय सेवेची दखल घेत चारचाकी वाहन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला. या गावांना नुकतीच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शिरवाडकर यांनी भेट देत तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या वैद्यकीय सेवेची माहिती जाणून घेतली. फोरमचे कार्य अधिक जलदगतीने पुढे जावे, तसेच या महिलांना चांगली सेवा देता यावी, यासाठी श्री मालतीमाधव ट्रस्टने कायमस्वरूपी तनिष्का व्यासपीठाला वाहन देण्याचा निर्णय घेत वाहनाची कागदपत्रे, तसेच संमतीपत्र "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्याकडे आज सुपूर्द केली.

आमच्या ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाताहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. "तनिष्का'च्या माध्यमातून एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहतेय. श्री मालतीमाधव ट्रस्टचे नेहमीच या उपक्रमांना सहकार्य असेल.
- राजेंद्र शिरवाडकर, संस्थापक अध्यक्ष, श्री मालतीमाधव ट्रस्ट, नाशिक

"सकाळ' माध्यम समूहाने तनिष्काच्या माध्यमातून एक मोठे काम उभे केले आहे. आदिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी
तनिष्कातर्फे दिली जाणारी मोफत वैद्यकीय सेवा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. याच भावनेतून आमच्या ट्रस्टने हा निर्णय घेतला. याहीपुढे तनिष्काच्या उपक्रमांना आमचे सहकार्य राहील.
- सीमा किशोर पाटील, उपाध्यक्षा, श्री मालतीमाधव ट्रस्ट, नाशिक

Web Title: tanishka doctors forum medical service social binding