‘तनिष्का’ निवडणुकींतर्गत अपूर्व उत्साहात मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आज शहरासह जिल्ह्यातील १४ केंद्रांवर तनिष्का निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्यांसह सर्वच क्षेत्रांतील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. 

जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आज शहरासह जिल्ह्यातील १४ केंद्रांवर तनिष्का निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्यांसह सर्वच क्षेत्रांतील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. 

सकाळी आठपासूनच मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. आपल्या गावातील, शहरातील महिलेने समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी नेतृत्व करावे, यासाठी असलेल्या मतदान प्रक्रियेत महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच पुरुषांसह इतरांनी मात्र मोबाईलवर मिस्डकॉल देऊन मतदान केले. उद्या (५ डिसेंबर) निवडणूक निकाल जाहीर होणार असून, त्यासाठीची उत्सुकता कायम आहे. शहरातील सु. ग. देवकर विद्यालयात देवयानी कोलते व निता वराडे यांनी, तर का. उ. कोल्हे विद्यालयात डॉ. सुषमा चौधरी व डॉ. वैशाली चौधरी यांनी निवडणूक लढविली. यावेळी शिक्षिका, परिचारिका, डॉक्‍टर्स, बचत गटाच्या सदस्या, महिला मंडळांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावला.  

‘मिस्डकॉल’ने मतदानाबाबत उत्सुकता
तनिष्का निवडणुकींतर्गत मतदान प्रक्रियेत मोबाईलवर ‘मिस्डकॉल’ देण्याचीही सुविधा होती. त्यामुळे तनिष्का सदस्या पती, मुलांद्वारे नातेवाइकांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस्डकॉल देऊन मतदानाचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून करीत होत्या. आजही मतदानस्थळी महिला आपल्या गटातील महिला, पुरुषांकडून त्यांच्या मित्र, नातेवाइकांना ‘मिस्डकॉल’ करण्याबाबत सांगत होत्या. आपण मिस्डकॉल दिल्यानंतर आपले मतदान नोंदविले गेल्याचे मोबाईलवर सांगण्यात येत असल्याने असंख्य नागरिकांनी या सुविधेचा लाभ करून घेतला.  

उत्साहपूर्ण वातावरण
जळगाव शहरातील मतदान केंद्रांवर उमेदवारांसह विविध क्षेत्रांतील महिलांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी युवतींचाही मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासोबतच महिलांनी मतदान केंद्रांवर रांगोळी, फुले रचत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. यावेळी जळगावचे महापौर नितीन लढ्ढा यांनी सपत्नीक येऊन उमेदवारांना शुभेच्छा देत मतदान प्रक्रिया पूर्ण केली. 

हायटेक प्रचार
तनिष्का निवडणुकीत ‘हायटेक’ तंत्राचाही वापर केला गेल्याने निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले. उमेदवार महिलांनी मोबाईल, व्हॉट्‌स ॲप, फेसबुकसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रचार केला तसेच वैयक्तिक भेटीगाठीही घेतल्या. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे मतांशिवाय हायटेक यंत्रणेद्वारे किती मते मिळतात, याकडे आता उमेदवार तनिष्कांसह मतदारांचे लक्ष लागून आहे.

आता पुन्हा एकत्रितपणे कामाचा निर्धार 
तनिष्का गटातून निवडणूक लढविणाऱ्या दोन्ही महिलांनी आपापली बाजू मांडत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकत्रितपणे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा निर्धार उमेदवार महिलांनी व्यक्त केला.

Web Title: tanishka election in jalgav