कालमर्यादेत जागा हस्तांतरित झाल्यास स्मारकाच्या नियोजित जागेत बदल - राधाकृष्णन बी.

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

येवला : सेनापती तात्या टोपे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागा बदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

येवला : सेनापती तात्या टोपे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागा बदलाची चर्चा पालमत्र्यांशी करून आगामी आर्थिक वर्षात स्मारक उभे करण्याचे काम करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

नियोजित स्मारक आगामी आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. कालमर्यादेत पालखेडची जागा हस्तांतरित झाल्यास स्मारकाच्या नियोजित जागेत बदल करता येईल असा पवित्रा जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केला. स्मारकाची जागा बदलाची मागणी जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी पालिका पदाधिकारी,प्रशासन आणि समिती यांची संयुक्त बैठकीचे आयोजन सोमवार दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते.

यावेळी जिल्हाधिकारयांनी पालिकेसह समितीचे म्हणणे ऐकून घेतले. समिती अध्यक्ष आनंद शिंदे, नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, रुपेश लोणारी, प्रवीण बनकर, अशोक संकलेचा यांनी स्मारक जलसंपदा विभागाच्या पालखेडच्या जागी पर्यटकांच्या सोयीची असलेल्या येवला-नाशिक रस्त्यावर व्हावे असा आग्रह धरला. 

पालिकेने स्मारकासाठी निश्चित केलेली साठवण तलावा जवळील जागा लोकवस्तीपासून निर्जनस्थळी व गैरसोयीची आहे.शिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणीपुरवठा टप्प्यासाठी ही जागा  भविष्यात उपयोगात येणारी आहे.स्मारक हे गैरसोयीच्या जागी न होता औरंगाबाद -नासिक महामार्गावर होण्याची अपेक्षा सर्व नागरिकांची असल्याचे लक्षात आणून दिले.नांदेसर शिवारातील जागेवर देखील चर्चा करण्यात आली.

सर्वदूर विकास व्हावा,या दृष्टीने साठवण तलावालगत नियोजित जागेत स्मारक का नको? अशी भूमिका यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. जमीन संपादन करणारी प्रक्रिया वेळखाऊ राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने स्मारकासाठी पालखेडची जागा 
मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी.व यासाठी प्रयत्न करावा असे ठरले.सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या  जागा बदलाचा चेंडू तूर्त तरी पालकमंत्री यांच्या कोर्टात टोलावला गेला.

स्मारकाच्या जागेत पालिका उभारणार असलेल्या जागेत दर्शनी भागात गाळे उभारून उत्पन्न घेवू या पालिकेच्या भूमिकेला जिल्हाधिकारी यांनी छेद दिला.स्मारक प्रवेशाला तिकीट आकारणी करता येणार नसल्याचे बजावले.बैठकीत समिती अध्यक्ष आनंद शिंदे,माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, बडाअण्णा शिंदे,राष्ट्रवादीचे गटनेते संकेत शिंदे,शिवसेनेचे दयानंद जावळे,अपक्ष गटनेते रुपेश लोणारी,नगरसेवक प्रवीण बनकर, प्रमोद सस्कर,  अशोक संकलेचा,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम,बांधकाम अभियंता अभिजित इनामदार,वस्तू विशारद सारंग पाटील,पाटबंधारे उपअभियंता भागवत आदी उपस्थित होते.

Web Title: tatya tope museum change place for it