करात सूट देण्याच्या ठरावाकडे साफ दुर्लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अशी दिली जाणार होती सूट 
स्वतःच्याजागेत पाच झाडे लावणे - 2 टक्के सूट 
सौर ऊर्जेचा वापर सुरू असल्यास - 2 टक्के सूट 
पावसाचे पाणी साठवण व पुनर्वापर - 2 टक्के सूट 
गांडूळ खत प्रकल्प सुरू असल्यास - 2 टक्के सूट

धुळे - अपारंपरिक ऊर्जा स्रोत, रेनवॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खतनिर्मिती, वृक्षसंवर्धन आदी पद्धतींचा अवलंब करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सूट देण्याचा विषय तीन वर्षांपूर्वी महासभेने मंजूर केलेला आहे. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी करण्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. किती मालमत्ताधारकांना ठरावाप्रमाणे लाभ दिला, याबाबत माहिती मालमत्ता कर विभागाकडे नाही. 

मालमत्ता करात सूट देण्याचा विषय 22 जानेवारी 2013 ला महासभेत आला होता. अनिल मुंदडा यांनी हा विषय सुचविला होता. तत्पूर्वी 17 मार्च 2011 ला पावसाचे पाणी साठवण व्यवस्थेसह गांडुळ खत, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, सांडपाण्याचे पुनश्‍चक्रण व पुनर्वापर अथवा पर्यावरणानुकुल गृहनिर्माणासाठी मालमत्ता करात एक टक्का सूट देण्याचाही ठराव केला होता. 

असा होता ठराव 
मालमत्ताधारकाने प्रत्येक वर्षाचा मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम बिल मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत एकरकमी अदा करून करात सूट मिळण्यासाठी अर्ज करावा, वसुली निरीक्षकांमार्फत त्या-त्या पद्धतीचा अवलंब केल्याबाबत खात्री करून तसा दाखल दिल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकाला करात सूट दिल्याचा लाभ पुढील वर्षाच्या बिलात समायोजन होईल असा ठराव होता. 

आकडेवारीही नाही 
तीन वर्षापूर्वी झालेल्या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मात्र महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आतापर्यंत किती नागरिकांनी याचा लाभ घेतला याचीही आकडेवारी मालमत्ता कर विभागाकडे नाही. करात सूट कशाकशामुळे मिळते, याबाबतही कर विभागाकडून जनजागृती करण्यात आलेली नाही. मालमत्ताधारकांना योजनेची माहितीच नसेल, तर ते त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतील कसा, असा प्रश्‍न यातून पुढे येतो. 

आता सुधारणेचा प्रस्ताव 
करात सूट देण्याच्या ठरावात पुढील वर्षात मालमत्ताधारकाला सूट देण्याचा निर्णय आहे. त्याऐवजी त्याच वर्षी त्याला तशी सूट मिळावी, यासाठी ठरावात सुधारणेचा प्रस्ताव ठेवल्याचे मालमत्ता कर विभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: tax allowances