पाचपट करातून धुळेकरांची मुक्ती करू - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सायंकाळी साडेसहाला येथील शिवाजी रोडवरील श्री कालिकामाता मंदिराजवळ सभा झाली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार ए. टी. पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, आमदार स्मिता वाघ, संजय सावकारे, सीमा भोये, गुरुमुख जगवानी, विजय चौधरी, संजय शर्मा आदी उपस्थित होते.

टक्केखोरांना सत्तेतून हटवा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की धुळ्याची अवस्था पाहिली तर धुळेकर खूप सोशिक आहेत, असे वाटते. नाशिक, जळगाव अशा जवळच्या शहरांची प्रगती झाली, धुळ्याची मात्र अधोगती झाली आहे. धुळ्याला शहर म्हणावे का अशी अवस्था आहे. महापालिकेत ज्यांनी पंधरा- पंधरा वर्षे सत्ता उपभोगली, त्यांना शहराबद्दल देणे-घेणे नाही. त्यांचे अस्तित्व केवळ टक्केवारी घेण्याएवढेच राहिले. महापालिकेवर ते नागासारखे बसले. हे चित्र बदलण्याची गरज आहे. महापालिका सत्तेत टक्केखोरच राहिले, तर स्थिती सुधारणार नाही. केंद्रात मोदी, राज्यात भाजप आणि इथे टक्केखोर अशी परिस्थिती राहिली तर हे शहर कधीच चांगले होऊ शकत नाही. ज्या शहरांनी भाजपवर विश्‍वास दाखविला तेथे निधी दिला. जळगाव, सांगलीत सत्ता आल्यानंतर आठव्या दिवशी शंभर कोटी दिले. धुळे शहराची विकासाची भूक मोठी आहे, ही भूक सरकारच्या माध्यमातून दूर केली जाईल.

भ्रष्टाचार निपटून काढू
भाजपला विकासाची दृष्टी आहे, त्यामुळे आमच्या हातात महापालिका देण्याची आवश्‍यकता आहे. धुळ्यातील मालमत्ता (घरगुती, व्यावसायिक) कर हे नाशिक शहराच्या तुलनेत जास्त असल्याचे लक्षात आणून दिले आहे. त्यावर पुन्हा शास्तीचा मार आहे. कर वाढवायचे आणि शास्ती लावायची. या पैशांतून त्यांनी मनपात भ्रष्टाचार करायचा आणि जनतेचे पैसे लुबाडून न्यायचे. हे आता यापुढे चालणार नाही. महापालिकेत सत्ता आल्यानंतर आम्ही ‘कराचे रॅशनलायझेशन’ करू. नाशिक व आजूबाजूच्या शहरांच्या तुलनेत हे ‘रॅशनलायझेशन’ केले जाईल. मालमत्ता करावरील शास्तीच्या भुर्दंडातूनही मुक्त केले जाईल. 

पैशांची कमतरता पडणार नाही
शहरवासीयांना सात- आठ दिवसांत पिण्याचे पाणी मिळते हा संदर्भ घेत अक्कलपाडा प्रकल्पातून धुळ्याला पाणीपुरवठा करू शकणारी १२० कोटींची योजना देण्याचे यापूर्वीच वचन दिले आहे, त्यामुळे या योजनेसह इतर सर्व मूलभूत सोयी-सुविधांसाठी राज्य सरकार निश्‍चितपणे पुढाकार घेईल. ३०० कोटींच्या भुयारी गटार योजनेतून शहराला प्रदूषणमुक्त केले जाईल. या कामांसाठी पैशांची कमतरता पडणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

हद्दवाढ क्षेत्रासाठीही शब्द
आपल्या भाषणात मंत्री डॉ. भामरे यांनी हद्दवाढीमुळे शहरात आलेल्या गावांसाठी ३५० कोटींचा आराखडा मंजूर केला तर विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढता येईल, असे म्हटले होते. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आराखड्यालाही मान्यता देऊ, असा शब्द दिला. झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा शासन निर्णय काढला आहे, त्यामुळे या लाभासह  पंतप्रधान आवास योजनेतून हक्काची घरे देऊ.

पातळी सोडायची नाही
फडणवीस म्हणाले, की सोशल मीडियाच्या मेसेजवर उगीच व्यथित होतात. कोण काय लिहिते हे पाहण्याची आवश्‍यकता नाही. भाजपच्या लोकांनी आपली पातळी सोडायची नाही. हा राष्ट्रीय पक्ष आहे, रस्त्यावरचा पक्ष नाही. 

कायद्याचेच राज्य चालेल
या ठिकाणी काही नेते गुंडागर्दी करतात. या ठिकाणी केवळ कायद्याचे राज्य चालेल, जो ते मानणार नाही त्याला कायद्याचा दंडा सरळ करेल. गुंडांचे राज्य चालू देणार नाही. ज्या लोकांना असे वाटते की राजकीय दृष्टीने आपण काहीही करू शकू आणि गुंडाराजला समर्थन देऊ शकू, त्यांना सांगतो कायद्याच्या दंड्याने त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही. धुळ्यात कायद्याचेच राज्य चालेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी निक्षून सांगितले.

टक्केवारी मागितली तर घरी जाल
आमची सत्ता आल्यास आमचा एकही नगरसेवक टक्केवारी घेणार तर नाहीच; परंतु त्याची भाषाही करणार नाही. आमच्या एकाही नगरसेवकाने तशी भाषा केली तर त्यांना घरी पाठविले जाईल. भले आमची सत्ता राहिली नाही तरी चालेल. मात्र, नगरसेवकांची टक्केवारी चालू देणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Web Title: Tax free Dhule people Devendra fadnavis