शिक्षकी पेशासह धुळ्याची "अस्मिता'ही रिंगणात

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 15 जून 2018

धुळे - राज्य विधान परिषदेअंतर्गत नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही उमेदवारांनी शिक्षकी पेशासह जिल्ह्याची "अस्मिता'ही रिंगणात उतरविली आहे. या मुद्यांच्या आधारे मतदारांचे लक्ष्य आकर्षित करण्यावर भर दिला जात असून नगर, नाशिक जिल्ह्याने विजयासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे. मात्र, मतांची गणिते आणि "रोटेशन'प्रमाणे धुळ्याला यंदा विजयाची संधी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

या निवडणुकीत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ही निवडणूक "टीडीएफ'सह सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे प्रचारात अनेक नव्या मुद्यांचा समावेश झाला आहे. उमेदवारीच्या रूपाने काही नवखे शिक्षकी चेहरे रिंगणात आल्यामुळे रंगत वाढली आहे.

नगर, धुळ्याला सत्तेची ओढ
निवडणुकीतून नगरला अद्याप प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे "टीडीएफ'ने गेल्या निवडणुकीत नगरचे राजेंद्र लांडे- पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे यंदा या संघटनेच्या उमेदवारीवर धुळे जिल्ह्यासह नाशिक, नगरचाही डोळा होता. त्यात धुळ्यातील इच्छुक उमेदवार संदीप बेडसे यांनी सरशी गाठल्याचे दिसून आले. मात्र, उमेदवारी निवडीच्या प्रक्रियेपासून वाद निर्माण झाल्याने आम्हीच "टीडीएफ'चे उमेदवार असल्याचा दावा-प्रतिदावा चौघांकडून होताना दिसतो. त्यामुळेच या निवडणुकीत जिल्ह्याच्या अस्मितेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात आहे. यातही नगरला आमदारकीची ओढ असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे, तर गेल्या निवडणुकांमधील आमदारकीची मिळालेली संधी पाहता दोन दशकांनंतर "रोटेशन'नुसार यंदा धुळे जिल्ह्याला ही संधी मिळू शकते, असा दावा केला जात आहे.

Web Title: teacher constituency election politics