विशेष शिक्षकांची वेतन कपात

जगन्नाथ पाटील
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कापडणे (जि.धुळे) - दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी 2006 मध्ये नियुक्त केलेल्या राज्यातील एक हजार 946 विशेष शिक्षकांना वेतनवाढ देण्याऐवजी एप्रिलपासून दीड हजार रुपयांची कपात करीत त्याच्या वसुलीचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. यामुळे विशेष शिक्षक संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सर्व शिक्षण अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिरते विशेष शिक्षक पद निर्माण केले आहे. हे विशेष शिक्षक दिव्यांगांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी; तसेच त्यांच्या शैक्षणिक सेवा सुविधांसाठी कार्यरत आहेत. अंध, अल्प अंध, अस्थिव्यंग्य, मतिमंद आदी विशेष विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत. धुळे जिल्ह्यात 21, नंदुरबार जिल्ह्यात चार, जळगाव जिल्ह्यात 50 तर संपूर्ण राज्यात एक हजार 946 विशेष शिक्षक आहेत. 2006 पासून ते मानधनावर काम करत असून, एप्रिल 2018 पासून त्यांच्या मानधनातून एक हजार पाचशे रुपये दरमहा कपातीचा आदेश सर्व शिक्षण अभियानाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी पुणे येथील शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे संघटनेने निवेदनाद्वारे केली.

वेतनवसुलीचा आदेश
वेतनवाढीबरोबरच नियमित शिक्षक म्हणून कायम करण्याची संघटनेची मागणी असताना उलट मानधनातून कपात केल्याने राज्य संघटना आंदोलन करणार आहे. या शिक्षकांना 2006-07 मध्ये चार हजार 800 रुपये मानधन होते. ते 2017 मध्ये 21 हजार पाचशे रुपये झाले. आता त्यातून दीड हजार रुपये कपात करण्यात येणार आहेत.

विशेष शिक्षकांच्या वेतनासंदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. वेतनश्रेणीनुसार राज्याने वेतन निश्‍चिती करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- किशोर वैरागर, राज्य अध्यक्ष, विशेष शिक्षक संघटना

Web Title: Teacher Salary Cutting