Nandurbar News : कोर्टात न गेलेल्या शिक्षकांनाही मिळणार एकस्तरचा लाभ! सुरेश भावसार यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teachers who did not go to court will also get one level benefit nandurbar news

Nandurbar News : कोर्टात न गेलेल्या शिक्षकांनाही मिळणार एकस्तरचा लाभ! सुरेश भावसार यांची माहिती

शहादा (जि. नंदुरबार) : जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर झाल्यानंतर त्यांची एक स्तर वेतनश्रेणी काढून घेण्यात येऊन त्यांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ घेण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने भाग पाडले होते. (teachers who did not go to court will also get one level benefit nandurbar news)

त्या वेळेस अखिल संघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षक जोपावेतो आदिवासी क्षेत्रात कार्यरत आहे तोपावतो त्यास एक स्तरचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. हे वेळोवेळी लेखी निवेदन देऊन चर्चेत समक्षही सांगितले होते. त्यानुसार न्यायालयात न गेलेल्या शिक्षकांना एकस्तरचा लाभ मिळणार असल्याचे अखिलचे राज्य सल्लागार सुरेश भावसार यांनी सांगितले.

एकस्तर साठी मध्यंतरीच्या काळात काही संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करून कोर्टात गेलेल्या शिक्षकांना एकस्तरचा लाभ कायम ठेवून वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ३ नोव्हेंबर २०२२ च्या पत्रामुळे याचिकाकर्त्या शिक्षकांनाच फक्त या योजनेचा लाभ दिला होता.

वास्तविक एका जिल्ह्यात कोर्टात जाणाऱ्या शिक्षकांना वेगळा व न्यायालयात न जाणाऱ्या शिक्षकांना वेगळा न्याय ही भूमिका नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असल्याचे अखिल नंदुरबार जिल्हा संघाने निवेदन सादर करून जिल्ह्यातील याचिकाकर्त्या शिक्षकांप्रमाणेच न्याय द्यावा, ही विनंती केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अवर सचिवांकडून मार्गदर्शन मागविले होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तथापि, शासनाकडून खुलासा लवकर मिळत नव्हता म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अखिलच्या शिष्टमंडळाने दूरध्वनीद्वारे व ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांशी संपर्क साधण्याची विनंती केली होती. त्यासाठी अखिलचे राज्य अध्यक्ष देवीदास बसवदे व राज्य सल्लागार सुरेश भावसार यांनी वेळोवेळी उपसचिवांची भेट घेऊन एकस्तरच्या लाभासाठी जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थी शिक्षकांनीही न्यायालयात धाव घ्यावी का, असा प्रतिप्रश्न करून पुनश्च निवेदन सादर केले.

त्यानुसार कर्मचारी आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत त्यांना एकस्तरचा लाभ देण्यात यावा. त्या काळात अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अथवा निवडश्रेणी मंजूर झाली असल्यास त्यांची काल्पनिक नोंद सेवापुस्तकात घेऊन ज्या वेळेस कर्मचाऱ्यांची बिगरआदिवासी क्षेत्रात बदली होईल त्या वेळेस एकस्तर वेतनश्रेणी बंद करून वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ सेवापुस्तकावरून देण्यात यावा. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसह जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.

टॅग्स :Nandurbarteacher