'तंत्रज्ञानामुळे शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक '

'तंत्रज्ञानामुळे शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक '

नाशिक - प्रगत तंत्रज्ञान, "सेबी'च्या नियंत्रणामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक आता पूर्वीप्रमाणे किचकट किंवा अवघड न राहता अधिक सुरक्षित व पारदर्शक झाली आहे, अशी माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी आज येथे दिली. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चर, सीडीएसएल (मुंबई) आणि एलकेपी सिक्‍युरिटीज (नाशिक) यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात "श...शेअर बाजाराचा' या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चरचे संतोष मंडलेचा, "ग्रीन मंत्राज'चे संचालक शर्मा, महिला समितीच्या सोनल दगडे, हेमांगी दांडेकर आदी उपस्थित होते. 

श्री. ठाकूर म्हणाले, ""शेअर बाजारात पैसे गुंतवा, आम्ही तुम्हास काही दिवसांमध्ये दुप्पट पैसे मिळवून देऊ, असे आमिष दाखवून काही जण लोकांना फसवितात आणि नाहक शेअर मार्केटला बदनाम करतात. आता प्रगत तंत्रज्ञान आणि "सेबी'च्या नियंत्रणामुळे शेअर बाजारातील व्यवहार खूप पारदर्शक झाले आहेत. कंपनी आणि दलालांना "सेबी'ची मान्यता असलेले प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे असून, त्याचबरोबर केलेल्या व्यवहाराची तपासणी केली जाते. त्यामुळे हे सर्व काही सोपे, सुटसुटीत आणि सुरक्षित झाले आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांना व्यवहार करण्यासाठी डी-मॅट खाते उघडावे लागते. शेअर बाजारात गतिमानता आणण्यासाठी "डी-मॅट' खात्याची पद्धत वरदान ठरली आहे. हल्ली शेअर्स प्रमाणपत्र हस्तांतर व्हायला अवघे काही सेकंद लागतात, म्हणून बाजार चांगलाच वाढला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत काही समज-गैरसमज आहेत. फक्त एका वेळी 15 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणे टाळावे. 

गुंतवणूक करताना कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याचा ढोबळ अभ्यास करायलाच हवा. साधारणपणे आपल्याला माहीत असलेल्या काही कंपन्या असतात. शेअर बाजार ढासळतो. त्या वेळी बाजारात गुंतवणूक करणे केव्हाही चांगले असते.'' 

ते म्हणाले, ""भारतात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र, ही गुंतवणूक मृत आहे. त्यामध्ये फारसा नफा होत नाही. त्यापैकी किमान दहा टक्के गुंतवणूक शेअर बाजारात केली, तरी शेअर बाजाराचे चित्र मोठ्या स्वरूपात बदलेल. भारताने गेल्या वर्षी एक हजार टन सोने आयात केले.'' 

श्री. ठाकूर यांनी सोप्या आणि सरळ भाषेत शेअर मार्केटबाबत माहिती दिली. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत काय भूमिका असायला हवी, याबाबत अर्थतज्ज्ञ विश्‍वनाथ बोदडे यांनी मार्गदर्शन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com