प्रलोभने दाखविणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना प्रत्येकी एक सहाय्यक निवडणूक अधिकारी अशा 20 अधिकाऱ्यांनी आज पदभार स्वीकारला. निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी व खातेप्रमुखांची आज संयुक्त बैठक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतली. यात प्रलोभने दाखविणाऱ्यांवर करावयाच्या कारवाईसह इतर महत्त्वपूर्ण कामकाजासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

आयुक्त कृष्णा यांच्या दालनात आज निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकारी व खातेप्रमुखांची ओळख करून देण्यात आली. आयुक्त कृष्णा यांनी नामनिर्देशन पत्र, शपथपत्र भरण्याबाबत राजकीय पक्ष व उमेदवार यांना प्रशिक्षण देणे, हेल्पडेक्‍स कार्यान्वित करणे, मतमोजणी केंद्र, मतदान केंद्र आणि संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र निश्‍चित करणे, निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, पैसा आणि बळाचा गैरवापर टाळण्यासाठी सनियंत्रण समितीची व त्यांच्या मदतीला उपसमितीची स्थापना, पेड न्यूज समिती व त्यांच्या उपसमितीची स्थापना, सोशल मीडिया प्रसिद्ध परवानगी समिती व त्यांना मदत करण्याऱ्या उपसमितीची स्थापना केली असल्याबाबत माहिती दिली. उमेदवारी अर्जासाठी राबविण्यात येत असलेली एक खिडकी योजना, प्रलोभने दाखविणाऱ्यांवर करावयाच्या कारवाईसंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

ऑनलाइनवर उद्या कार्यशाळा
यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती संबंधितांना व्हावी म्हणून राजकीय पक्ष, संघटना व इच्छुक उमेदवारांसाठी बुधवारी (ता. 25) कार्यशाळा होणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

Web Title: Temptations of the action will be show