TET Exam : ‘टेट’च्या परीक्षेसाठी भलतेच केंद्र; विद्यार्थ्यांचा गोंधळ अन् गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Exam

TET Exam : ‘टेट’च्या परीक्षेसाठी भलतेच केंद्र; विद्यार्थ्यांचा गोंधळ अन् गैरसोय

नवापूर (जि. नंदुरबार) : शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) (TET) साठी परीक्षार्थींना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्र न देता भलत्याच ठिकाणी परीक्षा केंद्र दिल्याने आर्थिकसह इतर गैरसोय होणार असल्याने तारांबळ उडाली आहे.

ही परीक्षा ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत होत असून, यात केंद्रवाटपाचा मोठा घोळ झाला आहे. (tet exam confusion about exam centre in examinees nandurbar news)

नंदुरबार परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील चिखलठाणा, जळगाव येथील धरणगाव हे केंद्र देण्यात आले आहे. नंदुरबार, धुळेमध्ये सुविधा उपलब्ध असतानाही येथील अनेकांना चक्क औरंगाबाद केंद्र दिले गेले.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. अनेकांनी परीक्षा परिषदेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवार असल्याने त्यांना दाद मिळाली नाही

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत होत आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८५०, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून ९५० रुपये इतक शुल्क घेतले आहे. हजार रुपयापेक्षा अधिक खर्च केलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती रविवारी परीक्षेचे हॉल तिकीट आले.

मात्र, त्यात भलतेच परीक्षा केंद्र पाहून अनेकजण चक्रावले. या परीक्षेसाठी उमेदवारांना तीन केंद्रांचे पर्याय देण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी नंदुरबार, धुळे, नाशिक हे परीक्षा केंद्र प्राधान्याने भरले होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अडीच लाख उमेदवार गोंधळात

परीक्षा परिषदेने ‘टेट’चे आयोजन ‘आयबीपीएस’ कंपनीकडे दिले आहे. जवळपास लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जवळपास २५ कोटी रुपये गोळा झाले आहेत. तरीही परीक्षा केंद्राचे नियोजन व्यवस्थित का करण्यात आले नाही, असा सवाल नंदुरबार, धुळे जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधी केंद्रावर पोचावे लागणार आहे. औरंगाबादच्या चिखलठाणा केंद्रावर पोहोचण्यासाठी नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी नेमके एक दिवस आधी निघावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावणार लागणार आहे.

"शिक्षण घेऊन बराच कालावधी गेला. नोकरी नाही, रोजगार नाही, ‘टेट’ परीक्षा देऊनही नोकरीची शाश्वती नाही. यात परीक्षा घेणाऱ्या कंपनीने तर कहरच केला, जवळचे परीक्षा केंद्र सोडून दोनशे ते अडीचशे किलोमीटरवरील केंद्र दिल्याने हा विद्यार्थ्यांचा छळ आहे. लांब प्रवास करून विद्यार्थी शारीरिक व मानसिकरीत्या थकल्यावर तो कोणत्या प्रकारे पूर्ण क्षमतेने परीक्षेला सामोरे जाईल." - संदीप सूर्यवंशी, नवापूर, परीक्षार्थी