मुक्ताईनगरात दुकानासह बंगला फोडला; लाखोंचा ऐवज लंपास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव - मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालयाशेजारील दुकानासह बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांवर ऐवज लांबविला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव - मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालयाशेजारील दुकानासह बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांवर ऐवज लांबविला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एसएमआयटी महाविद्यालय परीसरात सुहास प्रभाकर खडके (रा. जुने जळगाव) यांचे सुहास प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. रविवारी रात्री साडेनऊला ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. चोरट्यांनी रात्री त्यांच्या दुकानाच्या छताचा पत्रा कापून आत प्रवेश केला. बाजूलाच दैनिक लोकशाहीच्या संपादिका शांताताई वाणी यांचा लोकशाही बंगला आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्या लहान मुलगा नीलेश यांच्याकडे पतीसह गेल्या होत्या. रविवारी रात्री 11.57 वाजेच्या सुमारास तोंडाला आणि डोक्‍याला रुमाल बांधलेल्या दोन तरुणांनी कंपाउंडच्या भिंतीवरून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्याच्या पहिल्या माळ्यावरील मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत आल्यावर दोन्ही बेडरूमची कपाटे फोडून 40 हजार रुपये रोख आणि सोन्याची चेन, चांदीचे भांडे असा ऐवज लंपास केला. 

नाश्‍ता करून गल्ला साफ 
चोरट्यांनी दुकानातील लोणचे पॅकेट फोडून एका थाळीत टाकले. दुकानात असलेले ब्रेड, पाव आणि टोमॅटो सॉस त्यांनी खाल्ला. चोरट्यांनी जाताना तेलाची कॅन, तेलाचे पाऊच, वेफर्ससोबत घेतले. तसेच गल्ला फोडून त्यामध्ये असलेली रक्कम चोरली. 

चोरटे "सीसीटीव्ही'त कैद 
लोकशाही बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले असून, एसएमआयटी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीवरून दोघा चोरट्यांनी रस्त्यावर उडी घेतली. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर दोघांनी तीन कॅमेरे तोडले तर एक कॅमेरा उलट्या बाजूने फिरवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्‍स खालील माळ्यावर असल्याने त्याचे नुकसान मात्र ते करू शकले नाहीत. 

आज सकाळी प्रकार उघडकीस 
शांताताई वाणी या गावाला गेलेल्या असल्याने त्यांनी दररोज सायंकाळी घरातील लाइट लावण्याची जबाबदारी गंगूबाई पाटील यांच्यावर सोपविली होती. रविवारी सायंकाळी सहाला त्यांनी सर्व लाइट सुरू केले. आज सकाळी 7.20 वाजता त्या नातवाला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना त्यांना बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा पडलेला दिसला. त्यांनी घरात जावून पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी बंगल्याचे मालक राजेश यावलकर यांना फोन करून माहिती दिली. 

श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण 
घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाणे, जिल्हापेठ पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येऊन पाहणी केली. तसेच श्‍वानपथकाचे उपनिरीक्षक सोनुले, कर्मचारी मंगल पारधी, नीलेश झोपे यांनी श्‍वान जंजीरला, संशयित वस्तूंचा दर्प दिल्यानंतर त्याने सुहास प्रोव्हिजनपासून लोकशाही बंगल्यापर्यंत मार्ग दाखवत तो तेथेच घुटमळू लागला. बंगल्यासह दुकानातून ठसेतज्ज्ञांना आवश्‍यक ठसे मिळाले असून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Web Title: theft in Muktainagar