दुष्काळी स्थिती असल्याने लाखमोलाच्या पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. पण यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

येवला : पावसाळ्यात पावसाअभावी अवर्षणप्रवण येवल्यात परिस्थिती बिकट बनली आहे. अशात पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटले असून याचे पाणी गावोगावी आरक्षित बंधाऱ्यात भरून मिळवण्याची मागणी होत आहे. अगोदर हे पाणी देण्यासाठी जिल्हाधिकारी नकार देत होते. मात्र आता पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. पण यावरून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरीश महाजन समर्थकांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

पालखेड कालव्याच्या वितरिका क्रमांक 46 ते 52 वरिल बंधारे पाण्याने भरून देण्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिल्याचे भाजपा नेते बाबा डमाळे यांनी सांगितले आहे. डमाळे यांच्या शिष्टमंडळाला यश आज 7 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता गिरीश महाजन यांच्या मुंबई येथील शिवनेरी निवासस्थानी शिष्टमंडळांनी भेट घेतली असता पाण्याची समस्या कशी बिकट आहे समजून देण्यात आले त्यानंतर महाजन यांनी संबंधित पाटबंधारे अधिकारी यांना पाणी सोडण्याचे आदेश केल असे डमाळे यांनी म्हटले आहे. या भेटीचे फोटो देखील त्यांनी व्हायरल केले आहेत.

भुजबळांच्या पीएचा दावा सुमारे दोन महिन्या पासून पावसाने उघड दिल्याने खरीप हंगामाची पिके करपू लागली आहे तसेच पाऊसच नसल्याने  विहिरी तसेच बोअरवेल मध्ये पाणी येणे मुश्किल झाल्यामुळे नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मागील आठवड्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी दौऱ्यावर असताना परिस्थितीची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना 38 गाव पाणीपुरवठा योजना तसेच येवला व मनमाड पालिका पाणीपुरवठा योजनांना तात्काळ पाणी देण्याबाबत सूचित केले होते. त्याप्रमाणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन 1 ऑगस्ट पासून पाणी सोडण्याचे आदेश दिले.

तसेच गेल्या दोन दिवसात धरण क्षेत्रात 135 मीमी पाऊस झाल्याने भुजबळ यांनी प्राप्त परिस्थितीत वितरिका 46 ते 52 पर्यंत खरीपाचे आवर्तन देता येईल ही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले असून अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाला भुजबळ यांच्या प्रयत्नांनी दिलासा मिळणार आहे. असे त्यांचे येथील स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी म्हटले आहे. तर यापूर्वीच बंधाऱ्यात पाणी द्यावे या मागणीसाठी शिवसेनेचे मकरंद सोनवने यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले होते. नागरिक मात्र कोणी दिले व कसे आले याचा विचार न करता दुष्कळी स्थिती असल्याने व पाणी मिळणार असल्याने समाधानी असल्याचे चित्र आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is conflict between chagan bhujbal and girish mahajan at yevla because drought conditions