चाळीसगावच्या महाविद्यालयांत चोरट्यांची शाळा!

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 29 एप्रिल 2018

परिक्षेच्या काळात कुणीही बॅग आणू नये, अशी सुचना केलेली असते. पाण्याची बाटली व डबा विद्यार्थी जवळ ठेवू शकतात. मात्र, परीक्षा काळात मोबाईल बाळगता येत नाही. शिवाय पैसे असतील तर मुलांनी खिशात व मुलींनी पर्समध्ये ठेवायला हरकत नाही. आता मुलींना पर्स जवळ ठेवायला परवानगी आहे.
- मिलींद बिल्दीकर, प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय, चाळीसगाव.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव शहरातील महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. आशा परिस्थिती ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरीला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलीच सोय केलेली नाही. शिवाय भुरट्या चोरांना देखील पोलिसांचा धाक राहिला नसल्याने चोरीच्या घटना सुरू आहेत.

चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावरील महाविद्यालयात  25 एप्रिलला पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पेपर होता. परीक्षार्थी विद्यार्थिनींनी आपल्या बॅग महाविद्यालयाच्या आवारातील प्राचार्यांच्या निवस्थानी ठेवल्या होत्या. दहाला परीक्षेला सुरुवात झाली. त्या दरम्यान अकरा वाजून दहा मिनिटांनी कजगावच्या विद्यार्थीनीची बॅग चोरीला गेली. बॅगेत टॅब, रोकड, चष्मे, पेनड्राईव्ह या वस्तू होत्या. 

परिक्षेच्या कालावधीतील 'सीसीटीव्ही फुटेज' तपासले असता, त्यात बॅग चोरुण नेणारे दोन संशयित  तरुण दिसून आले. या घटनेच्या तीन दिवसपुर्वीच लेडीज हॉस्टेलमधून पिलखोड येथील एका मुलीच्या बॅगेतून तीन हजारांची रोकड लांबवली होती. शिवाय महाविद्यालयातील एका प्राध्यापकाचाही मोबाईल चोरल्याचा प्रकार घडला आहे. 

व्यवस्थापनाने घ्यावी काळजी...
परीक्षा देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सध्या महाविद्यालयांमध्ये गर्दी असते. परिक्षेची वेळ दहाला असते, तर कधीकधी एका दिवशी दोन पेपरही असतात. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनी  येतांना सोबत बॅग आणतात. ज्यात जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, अभ्यासासाठी पुस्तके किंवा नोट्स असतात. शिवाय खेड्यावरुन येत असल्याने संपर्कासाठी मोबाईलही जवळ ठेवतात.  

महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने किमान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. महागड्या वस्तू चोरीला गेल्यावर महाविद्यालय व्यवस्थापन विद्यार्थ्यांनाच दोषी ठरवून जबाबदारी झटकतांना दिसते. 

महाविद्यालयांमधील आशा भुरट्या चोऱ्या वाढत असून चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चोरी झाली त्यादिवशी होती भरती...
के. आर. कोतकर महाविद्यालयात 25 एप्रिलला विद्यार्थिनीच्या बॅगची जी चोरी झाली, त्या दिवशी महाविद्यालयात सुरक्षा जवान आणि सुपरवायझर पदासाठी भरती सुरु होती. भरतीसाठी परिसरातील बरेच तरुण आले होते. या भरतीच्या बहाण्याने आलेल्या काही तरुणांनी देखील बॅग लंपास केली असावी, अशी शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

परिक्षेच्या काळात कुणीही बॅग आणू नये, अशी सुचना केलेली असते. पाण्याची बाटली व डबा विद्यार्थी जवळ ठेवू शकतात. मात्र, परीक्षा काळात मोबाईल बाळगता येत नाही. शिवाय पैसे असतील तर मुलांनी खिशात व मुलींनी पर्समध्ये ठेवायला हरकत नाही. आता मुलींना पर्स जवळ ठेवायला परवानगी आहे.
- मिलींद बिल्दीकर, प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय, चाळीसगाव.

Web Title: thief in college at chalisgaon