जळगाव शहराजवळील फार्म हाउसवर ‘छम्मा-छम्मा’

Rave-Party
Rave-Party

जळगाव - यंदा शहरात पोलिसांच्या भीतीने ‘थर्टी फर्स्ट’ ‘फेल’ गेल्याची अवस्था होती. असे असताना शहरापासून काही अंतरावर ममुराबाद रस्त्यावरील एक फार्म हाउसवर बऱ्हाणपूर येथील तरुणींसह मदिरा-मुजऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर कुठलीही भीडभाड न बाळगता उपविभागीय पपोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यावर छापा टाकून सहा तरुणींसह २४ संशयितांवर कारवाई केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फार्म हाउस हे एका माजी महापौराच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. पकडण्यात आलेल्यांमध्ये राजकीय, व्यावसायिक बड्या हस्ती असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

सोमवारी (३१ डिसेंबर) २०१८ या वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेल-ढाबे रेस्टॉरंटचालकांनी तयारी केली होती. ठिकठिकाणी खासगी पार्ट्याही रंगल्या. ममुराबाद रस्त्यावर एका माजी महापौराच्या मालकीच्या फार्म हाउसवर ‘थर्टी फर्स्ट नाइट’चा जलवा काही औरच होता. बऱ्हाणपूरच्या खास विशीतील नृत्यांगना तरुणी बोलावून मदिरा-मुजरा मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. 

‘टीप’ मिळताच धडक कारवाई
गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाने रात्री एकला छापा टाकला. छाप्यात आंटीसह सहा तरुणी आणि दिलीप शालिग्राम पाटील (वय ५४, रा. पाळधी), तरुण रंगलानी (वय ३९,  साने गुरुजी कॉलनी), भारत राजकुमार तलरेजा (वय ३२, रा. सिंधी कॉलनी), मुन्ना वाहऱ्या बारेला (वय ३५, ममुराबाद), नितीन अशोक वाणी (वय ३२, मोहननगर), लाला वाहऱ्या बारेला (वय २३, ममुराबाद), सरफराज मिनाज शेख (वय २०, मास्टर कॉलनी), विशाल ओमप्रकाश वर्मा (वय ३८, रा. बी. जे.मार्केट), प्रवीण सोनमलजी जैन (वय ३७, बळिरामपेठ), राजेश गोविंद माहेश्‍वरी (वय ३७, एमआयडीसी), कमलाकर तुकाराम बनसोडे (वय ४०, रथ चौक), चंद्रकांत राजाराम खडके (वय ५२, विठ्ठलपेठ), प्रशांत विश्‍वनाथ अग्रवाल (वय ३७, सराफ बाजार), दिलीप दीपक रंगलानी (वय ३१, साने गुरुजी कॉलनी), कलीम खा अलीम खान (वय २८, बऱ्हाणपूर), गिरीश प्रकाश राहोटी (वय ३८, सिंधी कॉलनी), सय्यद जावेद सय्यद मतिन (वय २६, रा. बऱ्हाणपूर) अशा एकूण २४ संशयितांना पोलिसांनी अटक केली.

‘थर्टी फर्स्ट’चे बडे धेंडं पसार
फार्म हाउसवर ‘थर्टी फर्स्ट’ होताच साडेबारापर्यंत बहुतांश लोक निघून गेले होते. त्यानंतर पोलिसांचा छापा पडला असून, निघून गेलेल्यांपैकीच कोणीतरी पोलिसांना ‘टीप’ दिल्याची जोरदार चर्चा होती. मुजरा मैफलीत असलेल्यांमध्ये नगरसेवक, शहरातील बडे व्यापारी आणि काही नोकरदार असल्याचेही बोलले जात आहे.  

कारवाईबाबत पोलिसांचा ‘तमाशा’...!
सहा तरुणींसह १८ आंबटशौकिनांवर मध्यरात्री एकला छापा टाकल्यावर घटनास्थळावर पहाटे पाचपर्यंत कागदी घोडे नाचले. पहाटे सहाला पोलिसांसह हा लवाजमा तालुका पोलिसांत आला. गुन्हा दाखल करून साडेदहाला न्यायालयात पाठविण्यात आले. नंतर परत पोलिस ठाण्यात बोलावून गुन्ह्यांचे वेगळे कागद तयार करून पुन्हा दुपारनंतर न्यायालयात आणण्यात आले. दोन तास वाहन स्टेडियम कॉम्प्लेक्‍सजवळ उभे करून नंतर न्यायालयात न आणता न्यायाधीशांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथून पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. रात्री साडेनऊपर्यंत हा ‘तमाशा’ सुरू होता. नंतर पोलिसांनी न्यायालयात हजर न करताच सर्वांना वैयक्तिक जातमुचलक्‍यावर उद्या (ता. २) हजर राहण्याच्या समजपत्रावर सोडून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com