मालेगावात अतिक्रमण विरोधात हजारो शालेय विद्यार्थी रस्त्यावर

malegaon
malegaon

मालेगाव - शहरातील वाढते अतिक्रमण, शाळांना अतिक्रमणाचा असलेला वेढा, धुळ व ध्वनीप्रदुषण या विरोधात गुरुवारी (ता.१०) तीस शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. सुमारे वीस हजारहून अधिक विद्यार्थी अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी किदवाई रोड व भंगार बाजार रस्त्यावर सुमारे दोन तास ठिय्या मांडून होते. 

प्रांताधिकारी अजय मोरे, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे निवेदन स्विकारले. शहरातील विविध शाळांचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. अतिक्रमणामुळे शाळेत येतांना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन जावे लागते. सातत्याने लहान-मोठे अपघात होतात. त्याविरोधात आवामी पार्टी, शहरातील विविध सामाजीक संघटना, संस्था चालक आदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अतिक्रमण हटाव, जान बचाव अशा घोषणा विद्यार्थी देत होते. विद्यार्थ्यांनी अतिक्रमण विरोधी फलक हातात घेतलेले होते. आंदोलनाच्या पाश्‍र्वभूमीवर बॅरीकेटींग लावून पोलिसांनी दोन्ही रस्ते रहदारीसाठी बंद केले होते. उपअधिक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक व्ही.एन. ठाकुरवाड, मसुद खान व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिक्रमण न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी, पालक, स्वयंसेवी संघटना व संस्थाचालकांनी दिला.

शहरातील अतिक्रमण हटवावे. मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण हटविल्याशिवाय झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण काढू नये. मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर नव्याने अतिक्रमण होणार नाही या साठी उपाययाेजना करावी या मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी दिले. आवामी पार्टीचे रिजवान बॅटरीवाला यांनी सात दिवसात कार्यवाही न झाल्यास पाच कार्यकर्त्यांसह महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. आंदोलनास निहाल अन्सारी, जमील क्रांती, सतीश कलंत्री, निखील पवार, रामदास पाटील, रईस अन्सारी, डॉ. अनिस अहमद, मुर्तुजा अन्सारी, शब्बीर पंजाबी, खयाल अन्सारी, जियाउर रहेमान, युसूफ इलियास, जमील अन्सारी, आबीद अन्सारी, साजीद अहमद आदींसह जेएटी, एटीटी, मालेगाव, काकाणी, स्वेस, जैनब, गुलशन, पॅरेडाईज व मालेगाव गर्ल्स यासह तीस शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले. 

* शहरात आज या लक्षवेधी आंदोलनाची चर्चा सुरु होती.
* मनपा प्रशासनाने खंबीर भूमिका घेत अतिक्रमण हटवावे अशी मागणी होती.
* आंदोलनस्थळी खयाल अन्सारी यांची शेरोशायरी विद्यार्थ्यांची दाद घेवून गेली.
* विद्यार्थी मोठ्या जल्लोषात घोेणाबाजी करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com