तीन निवडणुकांमुळे दोन बोटांना शाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नाशिक - जिल्ह्यात एकावेळी पदवीधर, महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असल्याने किमान दोनदा मतदान करावे लागणाऱ्या मतदारांच्या दोन बोटांना शाई लावली जाणार आहे. त्यात पदवीधर मतदारांच्या उजव्या बोटाला, तर महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी डाव्या बोटाला शाई लागेल.

पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारीला, महापालिका व जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होईल. त्यामुळे एकाच महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी दोन वेगवेगळ्या बोटांना शाई लावली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या उजव्या बोटावर शाई लावण्याचे निर्देश आहेत. मात्र, नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी उजव्या बोटाला शाई लावली जाईल. त्यावर उपाय म्हणून महापालिका, जिल्हा परिषदेत मतदान करणाऱ्यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघातील ९६ हजार मतदार आहेत. महापालिकेसाठी दहा लाख ७८ हजार मतदार आहेत. जिल्हा परिषदेचे २४ लाख २७ हजार ३३५ मतदार आहेत. त्यात ९६ हजार पदवीधरांना दोनदा मतदान करावे लागणार असल्याने दोन बोटांच्या शाईचा पर्याय पुढे आला आहे.

पसंतीक्रमानुसार करा मतदान
पदवीधर मतदारसंघासाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. जांभळ्या रंगाच्या पेनने पसंती क्रमांक टाकावा लागणार आहे. पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर १, त्यानंतर पसंतीनुसार आकडे लिहावे लागणार आहेत. हे क्रमांक मराठी, इंग्रजी किंवा रोमन अंकातच (आकडा) लिहावे लागणार आहेत. अक्षरात लिहिल्यास ती मतपत्रिका बाद ठरणार आहे.

Web Title: Three elections two fingers with ink