पाण्याअभावी तीनशे एकरातील फळबागांची कत्तल

संतोष विंचू
सोमवार, 3 जून 2019

येवला : दुष्काळाच्या माहेरघरी मागील तीन वर्षात पाणी-पाणी करत तब्बल तीनशेवर एकरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, आंबे आदि फळपिकांच्या बागा शेतकऱ्यांनी पाण्याअभावी कुऱ्हाड चालवत जमीनदोस्त केल्या आहेत.

येवला : दुष्काळाच्या माहेरघरी मागील तीन वर्षात पाणी-पाणी करत तब्बल तीनशेवर एकरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, आंबे आदि फळपिकांच्या बागा शेतकऱ्यांनी पाण्याअभावी कुऱ्हाड चालवत जमीनदोस्त केल्या आहेत. या पिकांनी चांगले उत्पन्न दिले असताना जड अंतकरणाने पाण्याअभावी झाडांची कत्तल करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यावर्षी तर मोठ्या प्रमाणात बागा भुईसपाट झाल्या आहेत.

भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विभागलेला हा तालुका असून पश्चिम भागात पालखेडच्या पाण्याचा लाभ होतो तर उत्तर पूर्व खोऱ्यात मात्र पूर्णतः पावसावर परिस्थिती अवलंबून आहे. त्यातच वर्षागणिक तालुक्यातील पर्जन्यमान घटल्याने भूजल पातळीही खालावत असल्याने उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न गहन बनत आहे. पाण्याअभावी येथे आठमाही शेती पिकवली जाते. मात्र कृषी विभागाच्या पुढाकारातून झालेल्या जनजागृतीने शेतकरीही पुढे आल्याने अल्प पाण्याचे नियोजन करून द्राक्षांसह डाळिंब, आंबा, पेरू, शेवगा, साग आदि फळ व इतर बागा शेतकऱ्यांनी मागील पाच सात वर्षापासून घेतली आहे. तालुक्यात सुमारे १२०० हेक्ट्रपर्यत फळपिकांची लागवड वाढली होती. मात्र मागच्या तीन वर्षात पर्जन्यमानाचा धोका, अल्प पाणी आणि शेततळ्यातील पाणी पुरेनासे झाल्याने साहजिकच फळबागा उन्हाळ्यात डोळ्यादेखत करपताना शेतकऱ्यांनी पाहिल्या आहेत.
 

एकदा उन्हाळ्यात झटका बसला की बागा पुन्हा सुखावत नाही किंवा सुकवल्या तरी पूर्वीप्रमाणे फळपीक देत नाही. यामुळे दरवर्षी पाच ते दहा टक्कयापर्यंत बागांवर कुऱ्हाड चालली आहे. यावर्षी तर अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागासह पश्चिम भागात देखील डाळिंब व काही प्रमाणात द्राक्षांच्या बागा शेतकऱ्यांनी जेसीबी चालवत जमीनदोस्त केल्या आहेत. जाणकारांच्या माहितीनुसार मागील तीन वर्षात ३०० एकरांहून अधिक क्षेत्र फळपिकांखालून बाहेर आल्याचा अंदाज आहे.

पाटोदा व मुखेड परिसरातच द्राक्ष बागा तर या परिसरासह अवर्षणप्रवण पूर्व भागातही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब बागा लावलेल्या आहेत आणि त्यासाठी शेततळ्याचे ही सोय केली होती.परंतु आता प्यायला पाणी नाही तेव्हा शेततळ्यात कुठून आणणार असा प्रश्न मागील दोन्ही उन्हाळ्यात पडला आहे.त्यामुळे आता मरणासन्न झालेल्या भागात शेतकरी तोडून त्या ठिकाणी जमेल ते पीक घेऊ लागले आहे.

“दुष्काळी तालुका असूनही कृषी विभागाने प्रयत्नपूर्वक फळपिकांचे क्षेत्र वाढविले होते.मात्र पर्जन्यमान घटल्याने बागा जगवणे कठीण झाल्याने नाईलाजाने शेतकरी कुऱ्हाड चालवत आहेत. नागडे येथे तर निर्यात होणाऱ्या आंब्याची झाडे ही काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.शेतकऱ्यांनी पुन्हा फळबागांकडे वळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.”
- हितेंद्र पगार,कृषी अधिकारी,येवला.

"गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने बाग पाण्याअभावी काढून टाकावी लागली. डोळ्यासमोर सात वर्ष संभाळलेली अडीच एकर बागेतील ७५० झाले काढतांना खूप वाईट वाटले. बागा जगविण्यासाठी केलेला खर्च ही निघणे अवघड झाल्याने बाग तोडण्याचा निर्णय घेतला.”
- मच्छिन्द्र गुडघे, शेतकरी, चिचोंडी बुद्रुक

यावर्षी असे आहे फळपिकाचे क्षेत्र.
डाळिंब - ४२४ हेक्टर
द्राक्ष - ३७९  हेक्टर
पेरू - ७३  हेक्टर
चिकू - १४  हेक्टर
एकूण - ८९०  हेक्टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred acre horticulture is distoyed due to lack of water