नाशिकमध्ये शीतलहरींनी तिघांचा मृत्यू

नाशिकमध्ये शीतलहरींनी तिघांचा मृत्यू

नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे व नंदुरबारमध्ये शनिवार(ता. 9)च्या थंडीच्या लाटेबरोबर रविवारी (ता. 10) दिवसा गारठा कायम राहण्याची आणि थंडीच्या लाटेची शक्‍यता वर्तवली आहे. 

उत्तर-मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह मंगळवारी (ता. 12) गारपीट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या लाटेमुळे वाकद, कोळगाव (ता. निफाड) भागात दवबिंदू गोठले. यापूर्वी शीतलहरींनी कहर केला असताना, मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पारा घसरण्यास सुरवात झाली. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या द्राक्षबागांवरील संकट अधिक गडद झाले आहे. 15 ऑक्‍टोबरनंतर छाटलेल्या बागांत निर्यातीसाठी द्राक्षांच्या मण्यांचा आकार मिळेल की नाही?, अशी धास्ती शेतकऱ्यांत आहे. 

थंडीने गारठल्याने तिघांचा मृत्यू  
रामकुंड परिसरात तीन भिकारी सुलभ शौचालयाच्या भिंतीच्या आडोशाला एक-दोन चादरी घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. फाटक्‍या चादरीमुळे गोदाकाठी त्यांचा थंडीपासून बचाव झाला नाही. पहाटे सारे शरीर गारठल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी नागरिकांनी त्यांना पाहिले. मात्र, ते झोपले असतील म्हणून कोणी उठविण्याचा प्रयत्न केला नाही. दुपारी सेवा संस्थेच्या ऍड. राजपाल शिंदे, संजय बागूल, बाबाजी केदारे व कार्यकर्त्यांनी बेघरांचे सर्वेक्षण सुरू केले. त्या वेळी गंगाघाटावर अहिल्याबाई होळकर पुलाखाली सुलभ शौचालयासमोर तीन मृतदेह आढळले. एकाला त्याच्या ओळखीच्या लोकांनी उचलून नेले. दोघांचे मृतदेह 14 तास उलटूनही जागेवरच पडून होते. पंचवटी पोलिसही दुपारी साडेचारपर्यंत पोचलेले नव्हते. बेघरांसाठी राज्य शासनाने सहा बेघर निवारागृहे नाशिक महापालिका हद्दीत मंजूर केली आहेत. तसे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र, हा निवारा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाही, अशी स्थिती आहे. 

काढणीला 15 दिवसांचा विलंब  
हिमकण, घसरलेले तापमान आणि सतत वाहणाऱ्या शीतलहरी यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. मण्यांमध्ये साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे द्राक्षकाढणीचा वेग मंदावला आहे. द्राक्षकाढणीला सध्याच्या हवामानामुळे पंधरा दिवसांचा विलंब होण्याची शक्‍यता अधिक आहे. एवढेच नव्हे, तर काढणीला आधीच विलंब होत असताना हवामानात सुधारणा होऊन पारा उंचावल्यास बागांमध्ये तयार होणाऱ्या द्राक्षांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकदम द्राक्षे बाजारात आल्यास आगामी काळात द्राक्षांचे भाव कोसळण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. 

नाशिकमध्ये सर्वांत कमी पारा 
(आज नोंदवलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये) 
नाशिक- 04 महाबळेश्‍वर- 09 
कुलाबा- 15.6 सांताक्रूझ- 11 
अलिबाग- 13.2 रत्नागिरी- 11.7 
डहाणू- 13 पुणे- 5.1 
नगर- 6.1 जळगाव- 08 
कोल्हापूर- 13.1 मालेगाव- 7.8 
सांगली- 4.1 सातारा- 6.8 
सोलापूर- 12.1 औरंगाबाद- 6.5 
परभणी- 11 नांदेड- 9.5 
बीड- 9.1 अमरावती- 09 
चंद्रपूर- 13.2 गोंदिया- 12.4 
नागपूर- 8.9 यवतमाळ- 10.4 

तात्पुरत्या निवारागृहासाठी शासन कोट्यवधी रुपये देते. मात्र, त्याचा योग्य वापर केला जात नाही. त्यामुळे शनिवारी (ता. 9) तिघांचा मृत्यू झाला. थंडीसुद्धा एक आपत्तीच असताना शासकीय यंत्रणा मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे. आगामी काळात या बेघरांच्या प्रश्‍नावर आमची संस्था लढा दिल्याशिवाय राहणार नाही. 
- राजपाल शिंदे, अध्यक्ष, सेवा संस्था, नाशिक 

उत्तर भारतातील थंडीमुळे द्राक्षांना यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत किलोला दहा रुपयांनी कमी भाव मिळत आहे. स्थानिक बाजारपेठांसाठी 25 ते 45, तर निर्यातीसाठी 55 ते 80 रुपये किलो भावाने द्राक्षे विकली जात आहेत. थंडीमुळे देशांतर्गत आणि परदेशातही द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने भाव सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याचा आर्थिकदृष्ट्या ताण शेतकऱ्यांवर येईल. 
- कैलास भोसले, द्राक्ष बागाईतदार संघाचे पदाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com