तुफान दगडफेक करून वाहने लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना अटक ; दोन फरार

dagadfek.jpg
dagadfek.jpg

सटाणा :सटाणा-नामपूर रस्त्यावर कऱ्हे (त.बागलाण) गावालगत मध्यरात्री ये - जा करणाऱ्या वाहनांवर तुफान दगडफेक करत तलवारी व गजांचा धाक दाखवून लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शुक्रवार (ता.१५) रोजी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. दोघे संशयित दरोडेखोर फरार झाले आहेत. हे पाचही दरोडेखोर कऱ्हे येथीलच रहिवासी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काल शनिवारी (ता.१६) रोजी अटक केलेल्या तिघा दरोडेखोरांना सटाणा न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी : सटाणा – नामपूर रस्त्यावरील कऱ्हे गावाजवळ गुरुवारी (ता.१४) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विश्वास भामरे यांची स्विफ्ट डिझायर कारने सटाण्याकडे येत होते. यावेळी गावालगत असलेल्या गणपती नाल्यावर किरण संजय जगताप (वय २३), बबन भावराव अहिरे (वय २२), पंकज विठ्ठल म्हसदे (वय २१), गणेश निंबा सोनवणे, बबलू जयसिंग सोळंके (वय माहित नाही, सर्व रा.कऱ्हे) या पाच बुरखाधारी दरोडेखोरांनी दगडगोटे आणि झाडांच्या फांद्या रस्त्यावर टाकून भामरे यांच्या वाहनावर दगडफेक सुरु केली आणि तलवार आणि गजांचा धाक दाखवून त्यांची कार अडविली. यावेळी दरोडेखोरांनी कार मधील दोन महिलांसह पाच जणांना बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या गस्तीवर असलेले सटाणा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी कारमधील सर्वांची दरोडेखोरांपासून सुटका केली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या किरण जगताप, बबन अहिरे, पंकज म्हसदे या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. गणेश सोनवणे, बबलू सोळंके हे दोघे दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले.

दरम्यान, या दरोडेखोरांनी यापूर्वी देखील परिसरात वाहनांची तोडफोड करीत लुट केली असून मोठा धुडगूस घातला आहे. काही दिवसांपूर्वी कुपखेडा (ता.बागलाण) येथील पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर दरोडेखोरांनी हल्ला चढविला होता. मात्र ठाकरे यांनी प्रतिकार करून हा हल्ला परतवून लावला होता. तर डॉ.अमोल पवार यांचे आई-वडील रात्री नामपूरकडे जात असतांना त्यांच्या कारवरही हल्ला चढवून पवार दांम्पत्याला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत दरोडेखोरांनी बारा ते तेरा वाहने फोडून लुट केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी सटाणा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून तलवार, गज आणि मिरचीची पूड जप्त करण्यात आली आहे. आज सटाणा न्यायालयासमोर तिघा दरोडेखोरांना उभे केले असता न्यायाधीश पी. जे. तापडिया यांनी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फरार दरोडेखोरांच्या शोधार्थ एक विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com