जळगावकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे. याचाच फायदा घेत टॅंकरचालकांनी भाव वाढविले आहेत. 

जळगाव  - शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. त्यात वाघूर धरणातील जलसाठा २० टक्‍क्‍यांवर आल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे. याचाच फायदा घेत टॅंकरचालकांनी भाव वाढविले आहेत. 

शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. धरणात पाणीसाठा अल्प आहे. त्यातच जलवाहिनीला गळती किंवा फुटण्याचे प्रकार होऊन पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. यामुळे नागरिकांना कुठे पाणी मिळते का? यासाठी शोध घ्यावा लागत आहे. त्यात टॅंकरचालक नेहमीपेक्षा जादा दराने पाण्याची विक्री करत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. नागरिकांची ही होणारी आर्थिक लूट जिल्हा शासनाने पावले उचलून थांबवावी, अशी मागणी होत आहे. 

शहरात सुमारे ३० टॅंकर
जळगाव शहरात सुमारे ३० टॅंकर असून बांधकाम, हॉटेल, लग्नसोहळा आदी कार्यक्रम तसेच विविध कामांसाठी टॅंकरची मागणी होत असते. त्यात धरणात पाणीसाठा कमी, वारंवार फुटणारी जलवाहिनीमुळे शहरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने काही टॅंकर चालक अव्वाचे सव्वा दर आकारत आहे.  

टॅंकरचा भाव दुप्पट
दोन महिन्यापूर्वी शहरात ४०० ते ७०० रुपये टॅंकरचा दर होता. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसात काही टॅंकरचालक एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत दर घेत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.

दोनशे लिटरची टाकी ३० रुपयांना 
आर्थिक स्थिती कमी असलेले नागरिक तसेच पाणी साठविण्याचे साधन कमी असलेल्या नागरिकांना काही टॅंकरचालक पाणी वाटप १०० ते २०० लिटरच्या टाकी, कॅन आदी भरून देत आहे. दोनशे लिटरची टाकीसाठी सध्या ३० रुपये घेतले जात आहे.

पाण्याची बचत स्वयंपाकगृहापासून 
सद्या शहरातील जलसंकट लक्षात घेता पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यानुसार मी देखील पाणी वाचविण्याची सुरवात स्वयंपाकगृहातून सुरू केली आहे. भाज्या, दाळ, तांदूळ धुण्यासाठी कमी पाण्याचा वापर करून उरलेले पाणी फेकून न देता ते घरातील झाडांना टाकणे. कपडे धुण्यासाठी बकेटमध्ये पाणी घेऊन कमीत कमी पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घरातील लिकेज झालेले नळ दुरुस्त केले असून महापालिकेच्या नळांना जेव्हा पाणी येते तेव्हा घरातील उरलेले पाणी फेकून न देता त्याचा इतर कामांसाठी वापरण्याचा पाणी बचतीचा फंडा सुरू केला आहे.  
- प्रियंका पाटील, गृहिणी

Web Title: Time to buy water for Jalgaon citizen