प्रचंड गर्दीच्या चार दिवसांनंतर आज बॅंकांना शासकीय सुटी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नाशिक - गेले चार दिवस नागरिकांनी गजबजून गेलेल्या शहरातील बॅंका उद्या (ता. 14) शासकीय सुटी असल्याने बंद राहतील. त्यामुळे पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारताना दमछाक झालेले बॅंक कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळणार आहे. आज बॅंका सुरू ठेवण्यात आल्याने बॅंका बंद होईपर्यंत गर्दी होती. आज गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. 

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर एक दिवस सर्व बॅंका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवार (ता. 10)पासून बॅंका सुरू झाल्या होत्या. यादरम्यान शनिवार (ता. 12) व आज सुटी असूनही बॅंका सुरू राहतील, असा आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियातर्फे काढण्यात आला होता. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून बॅंकांमध्ये प्रचंड गर्दी होती. जुन्या नोटा भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. घरातील युवकांपासून तर ज्येष्ठ नागरिक, महिलांनी तासन्‌तास रांगेत उभे राहून पैसे भरण्यासाठी धडपड सुरू होती. आज शासकीय व खासगी कार्यालयांना, तसेच महाविद्यालयांनाही सुटी असल्याने घरातील पुरुष मंडळीने बॅंकेत गर्दी केली होती. दिवसभर रांगांमध्ये उभे राहून नाशिककरांनी कोट्यवधी रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये जमा केल्या. 

चार दिवस नागरिकांनी गजबजलेल्या बॅंका उद्या (ता. 14) गुरुनानक जयंती व पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बंद राहणार आहेत. त्यामुळे चार दिवसांपासून गर्दीत दिवस घालवून थकलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांना विश्रांती भेटणार आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाकडून आनंद व्यक्‍त केला जात आहे. 

आठवडाभर बॅंका अतिरिक्‍त वेळ सुरू राहणार 

नागरिकांच्या सोयीसाठी बॅंकांच्या कामकाजाच्या नियमित वेळेपेक्षा अतिरिक्‍त वेळ बॅंका सुरू ठेवल्या जाणार आहेत. येत्या आठवडाभर बॅंका सकाळी साडेनऊला सुरू होतील, तर सायंकाळी साडेपाचपर्यंत कामकाज सुरू राहणार आहे. नियोजित वेळेपेक्षा अडीच तास अतिरिक्‍त कामकाज बॅंकेमार्फत केले जाणार आहे. 

Web Title: Today banks government holidays