गुन्हेगारी, प्रशासनाविरोधात आज शिरपूर "बंद'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

शिरपूर - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेवर मंगळवारी (ता. 20) सायंकाळी सव्वापाचला सशस्त्र दरोडा टाकत साडेदहा लाखांची रोकड लुटून फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी शिरपूर पोलिसांनी मध्यप्रदेशासह परिसरात विशेष पथके रवाना केली आहेत. दरम्यान, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनाच्या उदासिनतेविरोधात उद्या (ता. 22) येथे "बंद'ची हाक देण्यात आली असून निषेधार्थ मोर्चाही निघणार आहे.

दरोडेखोरांचा रात्री उशिरापर्यंत मागमूस लागू शकलेला नाही. पोलिसांनी बॅंकेतून ताब्यात घेतलेल्या "सीसीटीव्ही फुटेज'ची छाननी करण्यात आली. त्यामधील चित्रिकरणाआधारे संशयितांचे रेखाचित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल आणि हेल्मेट घातल्याने त्यांची नेमकी छबी टिपणे दुरापास्त ठरत आहे. तरीही पोलिसांच्या विशेष सेलमार्फत छबी टिपण्याचे काम केले जाणार आहे.

पूर्वनियोजित कटाचा संशय
शहरातील अत्यंत वर्दळीच्या करवंद नाका परिसरात असलेल्या सेंट्रल बॅंकेच्या शाखेवर मंगळवारी सायंकाळी सव्वापाचला पडलेला दरोडा हा पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरोडेखोरांनी पुरेसा अभ्यास केला. सुरक्षा रक्षक नसलेली बॅंक, नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर खातेदारांचा किमान वावर, सुरक्षेच्या उपाययोजनांची वानवा, निसटून जाण्यासाठी आदर्श रस्ते, अशा सर्व बाबींची "रेकी' करूनच दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात ही लूट झाली. सुरक्षेप्रती असलेला गलथानपणा हेच दरोड्याचे प्रमुख कारण ठरले. बॅंकेत कोणत्या वेळी किती रोकड असेल याचा अचूक अंदाज दरोडेखोरांनी कसा बांधला हेदेखील गूढ आहे.

पोलिस अधिकाऱ्यांची भेट
दरोड्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी बॅंकेला भेट दिली होती. नंतर आज पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांनी भेट दिली. बॅंकेत पाहणी केली. व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून घटनाक्रम समजावून घेतला. अधीक्षकांनी शिरपूर पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक रफीक शेख, निरीक्षक दत्ता पवार यांना तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. शिरपूर पोलिसांतर्फे निरनिराळी पथके स्थापन करून मध्यप्रदेश, चोपडा परिसरात तपासकामी रवाना झाली आहेत. दरोडेखोरांच्या कार्यपद्धतीवरून ते सराईत गुन्हेगार असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांच्या नोंदीमधील संशयितांशी त्यांचे वर्णन पडताळून पाहिले जात आहे.

नोटांवर असा दरोडा...
दरोडेखोरांनी दहा लाख 26 हजार 565 रुपयांची लूट केली. त्यात दोन हजारच्या 404 नोटा, एक हजारच्या 118, पाचशेच्या जुन्या 82, पाचशेच्या नव्या 89, पन्नासच्या 42, वीसच्या 98, दहाच्या एक हजार 84, पाचच्या 33 नोटांचा समावेश आहे.

Web Title: today shirpur band