शौचालय आले दारी पण, पाण्याअभावी लोटापरेडची सुटेना वारी!

संतोष विंचू
शनिवार, 21 एप्रिल 2018

येवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात देखील पूर्ण झाले आहे. मात्र बांधलेले शौचालय नागरिक वापरतातच असे चित्र नसून अनेकांनी तर केवळ पाणी जास्त लागते म्हणून शौचालय कुलूपबंद ठेऊन लोटापरेडची वारीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र आहे.

येवला : तालुक्यात पंचायत समितीच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियानाला गती मिळून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य कागदावर अन काही अंशी प्रत्यक्षात देखील पूर्ण झाले आहे. मात्र बांधलेले शौचालय नागरिक वापरतातच असे चित्र नसून अनेकांनी तर केवळ पाणी जास्त लागते म्हणून शौचालय कुलूपबंद ठेऊन लोटापरेडची वारीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र आहे.

तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना आर्थिक मागासलेपण आणि मानसिकतेचा अभाव सुरुवातीपासून अडसर ठरला आहे.एक तर दुष्काळी भाग त्यात लोटापरेडची सवय तुटत नसल्याने मागील पाच-सहा वर्षे यासाठी झटावे लागले आहे.
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील अहिरे,गट समन्वयक प्रश्नांत शिंदे व सहकार्यांनी यांनी केलेल्या प्रयत्नाना यश आले आहे.गावोगावच्या ग्रामसेवकानी देखील याला चळवळीचे स्वरूप दिल्याने यशाला नक्कीच साद घालता आली आहे.शासनाचे बारा हजाराचे अनुदान व रोजगार हमी योजनेची साथ यामुळे शौचालय बांधण्याला अधिक चालना मिळाली आहे.

वास्तवात तालुक्यात २०११ च्या जनगणनेनुसार  ३५ हजार ८१८ कुटुंबाना शौचालय बांधकाम करणे गरजेचे होते. आज मितीला हा आकडा कागदावर पूर्ण झाला आहे.परंतु मागील सात वर्षात वाढलेली लोकसंख्या, विभक्त झालेले कुटुंब याचा विचार करता अनेक घरी शौचालय नाहीत.गावोगावी शौचालय नसलेल्यासह असूनही वापर न करणाऱ्यांची संख्या आजही २५ ते ३० टक्के असून हे कुटुंब उघड्यावरच शौचालय करत असल्याच्या अंदाज जाणकाराशी चर्चा केल्यावर आला आहे.

गावोगावी सर्वे केला असता,कितीतरी कुटुंबांनी बांधलेले शौचालय आज सरपण,गवऱ्या,शेतीचे साहित्य,पाईप,अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोगात आणले जात आहे.टंचाईग्रस्त उत्तर-पूर्व भागात तर अनेकांचे शौचालय वापर सिजनेबल असून आता कुलूपबंद करून ठेवले आहेत.भयावह पाणीटंचाईमूळे वापरायला टँकरचे मुबलक पाणी मिळत असल्याने व त्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत असल्याने शौचालयाला पाणी पुरवावे कसे हा मोठा प्रश्न सतावत आहे.यातूनच वापराचे प्रमाण घटल्याचे सांगितले जात आहे.

तसेच ग्रामीण भागात जुन्या विचारांच्या जेष्ठांना उघड्यावर बसण्याची लागलेली सवय व बंदिस्त बसल्यावर पोट साफ न होणे,बसल्यावर बिडी,सिगारेट पिण्याची सवय आदी गंमतीदार कारणे देखील सांगितले जातात.आजही ग्रामीण भागात किमान १५ ते २० टक्के कुटुंबाकडे शौचालय नसून नागरिकांची टाळाटाळ देखील कारणीभूत असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे.अर्थात यासाठी जागृतीचे प्रयत्न सुरू आहे.

■ २०१२ च्या सर्वेक्षणानुसार कुटुंब संख्या - ३५८१८
■ २०१२ ला शौचालय नसलेले कुटुंब - २४ हजार २०६
■ मार्च २०१६ पर्यतचे बांधकाम - ९ हजार १५१
■ मार्च २०१७ अखेर बांधकाम उद्दिष्ट - १५ हजार ५५
■ मार्च अखेर बांधकाम - १५ हजार ५५
■रोजगार हमी योजनेतून झालेले शौचालय - २ हजार ९७३
■ रोजयोतुन दिलेल्या प्र. मान्यता - ४ हजार
■ अनुदानापोटी झालेला खर्च - सुमारे ८ कोटी

■ हागणदारीमुक्ती साठीचे प्रयत्न - गुडमॉर्निंग पथक, टमरेलमुक्ती,ग्रामस्वच्छता, गृहभेटी, कलापथक,महिला सभा,कोपरा बैठका,व्हाटस अँप ग्रुप,गावनिहाय संपर्क अधिकारी नियुक्ती,
स्वच्छताफेरीचे आयोजन, सोशल मीडियाद्वारे जनजागृती, श्रमदान मोहीम, गवंडीकाम प्रशिक्षण, महिलांच्या सभा, हातधुवा उपक्रम, कीर्तन-कलापथक कार्यक्रम

Web Title: toilets are ready but no use by people