टोकरे कोळी समाजाचा आणखी एक आदर्श विवाह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

धुळे- टोकरे कोळी समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, पळासवाडा (तालुका शहादा, जि. नंदुरबार) येथे नुकताच क्रांतीकारी निर्णय घेऊन विवाह सोहळा पार पडला.

धुळे- टोकरे कोळी समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून, पळासवाडा (तालुका शहादा, जि. नंदुरबार) येथे नुकताच क्रांतीकारी निर्णय घेऊन विवाह सोहळा पार पडला.

टोकरे कोळी समन्वय समितीने धुळे-नंदुरबार जिल्ह्य़ातील टोकरे कोळी समाजाला आवाहन केले होते की, आपल्या समाजातील काही अनिष्ट प्रथा बंद केल्या पाहिजेत. यात हुंडा न घेणे, नारळ गोटा पध्दत बंद करणे, आहेर देणे व घेणे बंध करणे तसेच जेवणाच्या पंगतीत नारळ लावणे, खोबरे वाटी लावणे बंद करणे अशा काही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याला अक्कडसे (ता. शिंदखेडा, जि. धुळे, ह. मु. औरंगाबाद) येथील वर पिता बापू सखाराम सैंदाणे आणि पळासवाडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील वधू पिता कांतीलाल लाला ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. अमोल व सरीता या नव वर-वधूचा विवाह जमविला. या दोन परिवारातील सदस्यांनी हुंडा न घेणे- न देणे, असा क्रांतीकारी निर्णय घेऊन विवाह सोहळा केला.

वधू-वरासाठीचा बस्ता वधू व वर पक्षाने आपापल्या पध्दतीने केला. हा विवाह सोहळा पळासवाडा येथे नियोजीत वेळेतच मंगळवारी (ता. 9) झाला. त्यात तांदूळाऐवजी (अक्षता) फुले उपयोगात आणली. समाजाचे स्थानिक नेते शानाभाऊ सोनवणे यांनी आवाहन केले होते की, गरीबीमुळे अनेक लोक उपाशी राहतात. शेतकरी राब-राब राबूनही धान्य नीट पिकत नाही. विविध संकटांमुळे ते आत्महत्या करतात. त्यामुळे किमान विवाह सोहळ्यात अन्नाची नासाडी कोणी करू नये. त्याचे सर्व वऱ्हाडींनी पालन केले. कुणीही उष्टे पडू दिले नाही. सर्व पाहुण्यांचे ठाकरे व सैंदाणे परिवाराने आभार मानले. त्यांच्या धाडसी निर्णयासह प्रतिसादाची सर्वांनी प्रशंसा केली. वर पिता हवालदार असून, त्यांचा मुलगा कापड दुकानात नोकरीला आहे. मागास व प्रगतीसाठी झटणारा, मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या टोकरे कोळी समाजात असा आदर्श विवाह होऊ शकतो, तर त्याचे इतर समाजांनी अनुकरण करायला काय हरकत असावी?

Web Title: tokare koli marriage in nandurbar