येवल्यात मातीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो फेकले जनावरांपुढे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

गंभीर म्हणजे तालुक्यात असे अनेक शेतकरी टोमॅटो फेकत आहेत किंवा जनावराना टाकत आहेत. सुरवातीला चांगला मिळणारा भाव दोन दिवसांपासून अचानक कोसले आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना गुंतवलेले भांडवल मिळणे कठीण झाले आहे.

येवला : टोमॅटो विक्री केल्यावर आज भाव मिळाला प्रति कॅरेटला ५० रुपये. यात गावापासून बाजार समितीपर्यंत प्रति कॅरेटचे वाहतूक भाडे जाते २० रुपये आणि तोडण्यासाठी मजुरी लागते २० रुपये. १० रुपये हातात उरतात. मात्र त्यालाही सतरा वाटा. कारण प्रति कॅरेटचा उत्पादन खर्चच २० ते ३० रुपयांपेक्षा अधिक असतो. यामुळे वैतागलेल्या विखरणी येथील नवनाथ पगार, बापूसाहेब शेलार यांनी शेतातील तोडलेले टोमॅटो जनावरांच्या पुढे टाकले व आपला संताप व्यक्त केला.

गंभीर म्हणजे तालुक्यात असे अनेक शेतकरी टोमॅटो फेकत आहेत किंवा जनावराना टाकत आहेत. सुरवातीला चांगला मिळणारा भाव दोन दिवसांपासून अचानक कोसले आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना गुंतवलेले भांडवल मिळणे कठीण झाले आहे. आज सर्वत्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
 
हजारो रुपयांची गुंतवणूक करून संपूर्ण कुटूंबासह काबाडकष्ट करूनही प्रति कॅरेटला ५० ते ६० रुपयांचा भाव मिळतो त्यात प्रती कॅरेट २० रुपये भाड्यापोटी खर्च होतात शिल्लक राहिलेल्या २० रुपयापैकी शेकडा १० टक्के रक्कम आडत, हमाली यासाठी खर्च होते उर्वरीत रकमेत मजुरीची रक्कमही देता येत नसल्याने मजुरांसाठी द्यावी लागणारी रक्कमही आता कर्जरूपाने उभी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

तालुक्यात पाटोदा, विखरणी, विसापूर, मुखेड, अंदरसूल, राजापूरसह संपूर्ण तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाने दगा दिल्याने अल्प पाण्यावर मका पिक घेऊ असे धोरण या पिकानेही दगा दिल्याने अंगलट आले आहे. या पिकालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने भांडवलासाठी घेतलेले कर्ज फेडावे कसे असा प्रश्न सतावतो आहे. आज भाव एकूण शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीला न नेता शेतातच त्याची विल्हेवाट लावली.

“शेतीत हजारो रुपये गुतवले पण हातात काहीच पडत नाही. काय पिकवाव अन कसं विकावं..अशी गत झाली आहे. मागील वर्षी कांदा व मकाने भावात दगा दिला म्हणून यंदा नगदी असलेले टोमॅटो लावले पण पिक विक्रीला आले आणि घात झाला. यामुळे जनावरांपुढे फेकले.”
- नवनाथ पगार शेतकरी, विखरणी

“पाकिसातची बॉर्डर बंद तर पावसामुळे मागणी घटल्याने टोमॅटोच्या भावात अचानक मोठी घसरण झाली आहे. तालुक्यात अनेक शेतकरी यामुळे न परवडणारे टोमॅटो फेकत आहेत. पुढील महिन्यात भावात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.”
- दत्ता सानप, टोमॅटो उत्पादक,राजापूर

Web Title: Tomato does not get good market prices at Yeola