पाकिस्तानात टोमॅटो 300 रुपये किलो; सरकारचा निर्णय अंगलट

Tomato in Pakistan are Rs.300 kg
Tomato in Pakistan are Rs.300 kg

पिंपळगाव बसवंत - भारतीय टोमॅटोचा सर्वांत मोठा आयातदार देश पाकिस्तानात टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. तेथील सरकारने भारतातील पालेभाज्यांची आयात बंद केल्याचा हा फटका असून, त्याची किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे.

भारतात मोदी सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील ३७० वे कलम हटविण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातील पालेभाज्यांची आयात तडकाफडकी बंद करतानाच सर्व व्यवहारही तोडले आहेत. याचा फटका काही प्रमाणात भारतीय शेतकऱ्यांना बसला असला, तरी सर्वाधिक किंमत मात्र पाकिस्तानच्या नागरिकांना मोजावी लागत आहे. 

भारतात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बिहार, गुजरात, छत्तीसगड, तमिळनाडू, झारखंड या राज्यांत वेगवेगळ्या हंगामात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. त्यांपैकी किमान ५० हजार टन टोमॅटो पाकिस्तानला, तर ३० हजार टन टोमॅटो बांगलादेशात दर वर्षी निर्यात होतो. सीमेवरील स्थितीवर ही निर्यात अवलंबून असते. 

सध्या महाराष्ट्रातील नारायणगाव येथे हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव येथील हंगामाचा पडदा बाजूला सरकला आहे. हंगामात नाशिक जिल्ह्यातून रोज शंभर ट्रक टोमॅटो पाकिस्तानमध्ये निर्यात होतात. नाशिक, पिंपळगाव बसवंत, लासलगाव बाजार समितीत सध्या रोज एकूण १० क्रेट्‌स(प्रत्येकी २० किलो)ची आवक सुरू आहे. मुसळधारेने टोमॅटोचा हंगाम काहीसा लांबला असला, तरी पंधरा दिवसांत ही आवक एक लाखपेक्षा जास्त क्रेट्‌सची होईल. सध्या सरासरी ३०० रुपये प्रतिक्रेट्‌स असा दर मिळत आहे. आवक वाढली व परराज्यांतील स्थानिक टोमॅटो बाजारात आले तर भाव अधिक कोसळण्याची भीती आहे.

बांगलादेशात निर्यात शक्‍य
दरम्यान, पाकिस्तानची सीमा बंद झाल्याने भारतीय शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात झळ बसणार आहे. पण देशभक्तीसाठी ही झळ सोसण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे. काश्‍मीर मुद्द्यावर तणाव पाहता पाकिस्तानात टोमॅटोची निर्यात होण्याची चिन्हे धूसर आहेत. दुसरीकडे बांगलादेशच्या सीमेवर सोमवारी (ता. १२) भारतीय जवानांनी शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. त्यामुळे बांगलादेशात भारतीय टोमॅटोची निर्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

दर वर्षी हंगाम सुरू असताना बऱ्याचदा सीमा बंद होते. ही संधी साधून व्यापारी भाव पाडतात. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. पाकिस्तानने नाही घेतला तरी चालेल, पण इतर देशांत टोमॅटो निर्यातीसाठी केंद्र शासनाच्या कृषी व वाणिज्य विभागाने प्रयत्न करावेत.
- रवींद्र जाधव, टोमॅटो उत्पादक, चांदवड

पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वाधिक टोमॅटो निर्यात होतो, पण काश्‍मीर मुद्द्यावरून भारतातील भाजीपाला आयात बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. त्याचा बाजारभावावर परिणाम होईल, पण बांगलादेशात निर्यात होणार असल्याने ही बाब दिलासा देणारी आहे.
- सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com