सटाण्यात उद्या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे महंत पंडित गुरुजी हे या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी आज येथे दिली.
 

सटाणा - हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे उद्या सोमवार ता. 19 ला सायंकाळी पाच वाजता शहरातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सव पटांगणावर अनेक साधूमहंतांच्या उपस्थितीत हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे महंत पंडित गुरुजी हे या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी आज येथे दिली.

याबाबत बोलताना श्री. बागड म्हणाले, हिंदू संस्कृती ही विश्वातील पुरातन व महान संस्कृती आहे. या संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्याबरोबरच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जगभरातील हिंदूंना संघटीत करण्याच्या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. देवमामालेदारांच्या यात्रोत्सव पटांगणावर आयोजित या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आयुर्वेदाचार्य महंत श्री श्री 1008 माधवानंद सरस्वती महाराज हे भूषविणार आहे. सकाळी 10 वाजता शिरपुरच्या श्रीराम मंदिराचे मठाधिपती महंत सतीशदास महाराज भोंगे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून धर्मवीर गोरक्षक मच्छिंद्र शिर्के (मालेगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दुपारी 2 वाजता ब्रह्मवृंदांचा मंत्र जागर व वैदिकांची बैठक होणार असून सायंकाळी पाच वाजता स्वागताध्यक्ष भालचंद्र बागड व अरुणा बागड यांच्या हस्ते आचार्य जगतगुरू व यतीवर्यांचे पाद्यपूजन होईल. यानंतर अनेक साधू संतांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशनास सुरुवात होईल. यावेळी महंत महानंदबाबा काल्हेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. तसेच भागवताचार्य, गायन सम्राट बापुलालजी ठाकूर यांच्या भक्ती संगीत व शिवाबापू ठाकरे यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. या अधिवेशनास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.बागड यांनी केले आहे. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, सचिव धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, कौतिक सोनवणे, रमेश सोनवणे, विजय पाटील, रमेश देवरे, राजेंद्र भांगडिया, सुनील मोरे, हेमंत सोनवणे, बाबुराव सोनवणे, प्रवीण पाठक, वारकरी संप्रदायाचे संभाजी महाराज बिरारी आदी उपस्थित होते.

Web Title: Tomorrow's fourth National Convention of Hindu Dharma sanskruti rakshak Sangh