व्यापाऱ्यानेच लुटीचा रचला होता बनाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

बॅंकेच्या आतील व बाहेरील सीसीटीव्हीतील हालचाली व संशयित व्यापाऱ्याच्या फोन कॉल्स डिटेल्सवरून संशयित अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

नाशिक - लासलगाव येथे गेल्या सोमवारी अॅक्‍सिस बॅंकेतून 9 लाखांची रोकड काढल्यानंतर चारचाकीतून निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पुड फेकली आणि दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रोकडची बॅग नेल्याची घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने तपास करीत सदरील लुटीचा बनाव व्यापारी राहुल सानप यानेच चौघांच्या मदतीने केल्याची उकल केली आहे. बॅंकेच्या आतील व बाहेरील सीसीटीव्हीतील हालचाली व संशयित व्यापाऱ्याच्या फोन कॉल्स डिटेल्सवरून संशयित अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

संशयित व्यापारी राहुल शंकर सानप (28, रा. पाचोरे बु. विंचुर, ता. निफाड), अभिजित भाऊसाहेब सानप (26, रा. निमगाव, ता. सिन्नर), रमेश नामदेव सानप (27, रा. पाचोरे बु. विंचूर, ता. निफाड) या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटीची 8 लाख रुपयांची रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणातील एक संशयित पसार आहे. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी राहुल सानप याने संशयित अभिजित सानप, रमेश सानप व आणखी एक यांच्यासमवेत मिळून लुटीचा कट रचला होता. त्या कटानुसार, व्यापारी राहुल सानप याने गेल्या सोमवारी (ता. 23) लासलगाव-विंचूर रस्त्यावरील ऍक्‍सिस बॅंकेतून 9 लाखांची रोकड काढली. ती रोकड घेऊन तो त्याच्या स्वीफ्ट कारजवळ आला. रोकडची बॅग त्याने गाडीत ठेवली व चाक पंचर असल्याने तो पुन्हा कारखाली उतरला असता, कटाप्रमाणे दुचाकीवरून संशयित अभिजित सानप व साथीदार आले. त्यांनी कारमधील रोकडची बॅग उचलली आणि राहुल सानप यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून निघून गेले. तर रमेश सानप याने ठरल्याप्रमाणे राहुल सानप यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. व्यापाऱ्याच्या लुटीप्रकरणी संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी काल (ता. 24) लासलगावच्या बाजार समितीतील लिलाव बंद ठेवत पोलिसांचा निषेध केला. 

गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, आशिष आडसुळ, उपनिरीक्षक डी.एस. मुंढे, रवींद्र शिलावट, जीवराज इलग, भगवान निकम, नंदू काळे, राजु सांगळे, संदीप लगड, राजू वायकंडे, जोपुळे, महाजन, शिंदे, आजगे यांच्या पथकाने जबाबदारी पार पाडली. 

सीसीटीव्ही फुटेज अन्‌ कॉल डिटेल्स 
पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथके लगतच्या शहरांमध्ये रवाना केली गेली. बॅग हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करणे सुरू केले. तर एका तांत्रिक पथकान्वये बॅंकेच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज आणि बॅंकेलगत असलेल्या कृषी केंद्राबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासणी केली. त्यावरून संशयित राहुल सानप याच्या बॅंकेत 17 मिनिटांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यावरून त्याचे मोबाईलचे कॉलडिटेल्स घेतले असता त्यावरून गुन्ह्यांची उकल झाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The trader stole the money in Nasik