सटाण्यात वाहतूक कोंडी अन पोलिसांची दांडी

satana
satana

सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पालिका व पोलीस प्रशासन या वाहतूक कोंडीवर कोणताही तोडगा काढण्यात अद्यापही अपयशी ठरल्याने शहरवासियांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ऐन वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक पोलिसच गायब असल्याने काल सोमवार (ता.18) रोजी शाळेतून घरी परतण्याच्या वेळेस महामार्ग ओलांडताना विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे असलेल्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या हा रहदारी ठप्प होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातच काल अवजड वाहने, बेशिस्त चालक, वाहतूक पोलीसांची उदासीनता यामुळे सटाणा शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली. सोमवार (ता.१८) रोजी दुपारी मराठा हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल व अभिनव बालविकास मंदिर या सकाळ सत्रातील शाळा सुटल्याने शहरातील (कै.) पं. ध. पाटील चौकात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. त्यातच महामार्गावरून नाशिक, मालेगाव व ताहराबादकडे ये - जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. थेट जिजामाता उद्यान, स्टेट बँक, बसस्थानक, ताहाराबाद नाका ते यशवंतनगरपर्यंत वाहतूक दुतर्फा विस्कळीत झाली होती. (कै.) पं. ध. पाटील चौकात वाहतूक पोलीसासाठी स्वतंत्र चौकी दिलेली असतानाही ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस जागेवरून गायब असल्याचे दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणत्याही उपाययोजना करत नसल्याच्या तक्रारी यावेळी पालकांनी केल्या.

शहरातील स्टेट बँकेसमोर थेट महामार्गावरच दररोज दुचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग असते. शेकडो दुचाकीधारक बँकेसमोरच आपापली वाहने पार्कींग करीत असल्याने तेथूनच वाहतूक कोंडी सुरू होते. अनेक विद्यार्थी गावात राहात असल्याने त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव मुठीत धरूनच महामार्ग ओलांडून ये - जा करावी लागते. बेशिस्त वाहनचालक, फेरीवाले, अनधिकृत वाहन पार्किंग करणारे चालक याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडूनही कारवाई होत नाही. शाळा भरताना व सुटताना हजारो विद्यार्थ्यांची मोठी गर्दी उसळते. त्यात पंचायत समिती व तहसील कार्यालयात ये - जा करणाऱ्यांची या गर्दीत भर पडत असते. या चौकात पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी झाल्याने पोलीस प्रशासनाने एक चौकी उभी केली. मात्र त्यात बऱ्याचवेळा वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावते.

तीन दिवसांपूर्वीच (कै.) पं. ध. पाटील चौकात भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने ५५ वर्षीय व्यक्तीला चिरडले होते. महामार्गावरील अतिक्रमण काढून दुतर्फा पिवळे पट्टे मारावेत आणि शहरातून जाणारी अवजड वाहतूक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावी या मागणीकडेही पोलीस आणि पालिका प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. शाळा भरताना अथवा सुटताना एखादी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा न करता तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com