वाहतूक नियम मोडल्यास आता घरपोच ‘मेमो’

e-challan-process
e-challan-process

जळगाव - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक आता पोलिसांच्या नजरेतून सुटले, तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचू शकणार नाही. अशा वाहनचालकांना घरपोच ‘मेमो’ पोचवून दंड वसूल करणारी ई- चलन प्रणाली आज कार्यान्वित करण्यात आली. शहरातील प्रमुख २२ चौकांमध्ये ५६ कॅमेऱ्यांद्वारे वाहनांवर नजर राहणार असून, त्यामुळे वाहतुकीस शिस्त लागण्याची अपेक्षा आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व वाहनसंख्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती आणि पोलिस कारवाईत येणारा राजकीय हस्तक्षेप पाहता सिग्नलवर उभ्या वाहतूक पोलिसाला कारवाई करणे अशक्‍य होते. आता मात्र, वाहतूक शाखेत ई-चलन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्याहस्ते या प्रणालीचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह उपविभागातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

पुराव्यासह ‘मेमो’ घरपोच
लाल सिग्नल असतानाही गाडी पळवणारे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे, अपघात करून पळ काढणारे अशा सर्वांवर आता वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल! वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस आता ई-चलनद्वारे दंडात्मक आणि थेट केस दाखल करण्याची कारवाई करणार आहेत. आजपासून या कारवाईला सुरवात झाली. ई-चलनाकडे दुर्लक्ष केल्यास या चालकांचा परवानाही रद्द होऊ शकतो, चलन घरपोच आल्यावर तत्काळ दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. 

अशी होईल कारवाई
शहरातील २२ महत्त्वाच्या चौकात कार्यान्वित असलेले ५६ सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे सध्या ई-चलन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. पूर्णतः: कामकाज सुरू झाल्यावर पुढे एनपीआर कॅमेऱ्यांचे जाळे शहरात उभारले जाणार आहे. शहरातील टवाळखोर आणि विविध गुन्ह्यातील संशयितांवर कारवाई करताना या कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. गुन्हा घडताच कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवून असलेल्या कर्मचारी- अधिकाऱ्यांकडून तत्काळ संबंधित वाहन टॅग करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.

व्हॉटस्‌ॲपही कनेक्‍टेड 
ज्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरा नसेल त्या ठिकाणी व्हॉटस्‌ॲपद्वारे पोलिस कर्मचारी आणि कोणही सामान्य नागरिक वाहतूक नियम मोडल्याचा फोटो टाकू शकणार असून त्याआधारे त्यांच्यावर कारवाई होणार आहे, ई-चलन प्रणालीशी व्हॉटस्‌ॲप नंबर जोडण्यात आला असून ७४९९५०८२९९ या मोबाईल नंबरवर नियम मोडणाऱ्यांचे फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विचित्र नंबरप्लेट आव्हानच!
वाहतूक शाखेत ई-चलन कार्यप्रणाली कार्यान्वित झाली असून पहिल्याच दिवशी सुसाट कार पळवणाऱ्या चालकाचे वाहन अंकित करण्यात येऊन त्याच्या नावाचे ई-चलन जनरेट होऊन कलम-१८४ प्रमाणे, घरपोच चलन प्राप्त होणार आहे. वाहतूक विभागाकडे जवळपास ५ लाख वाहनधारकांचा डाटा तयार असून लवकरच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ऑनलाइन प्रणालीशी त्यांना जोडण्यात येऊन देशभरातील कुठल्याही वाहनाच्या नंबरवरून मालकाचे नाव, गाव- पत्ता काढणे सहज शक्‍य होणार आहे. मात्र, दादा-भाऊ, अण्णा, अशा विचित्र नंबरप्लेटचा शोध घेऊन कारवाई करणे अगोदर गरजेचे असून त्याशिवाय वाहतूक नियमांच्या पालनासह गुन्हेगारांना पकडण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com