बम बम भोलेच्या गजराने त्र्यंबकेश्‍वर शिवमय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुनगंटीवारांनी घेतले सहकुटुंब दर्शन; भाविकांचे हाल सुरूच

त्र्यंबकेश्‍वर - ‘बम बम भोले’च्या गजरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनार्थ भाविकांनी त्र्यंबकेश्‍वर फुलून गेले. लागलेल्या प्रचंड मोठ्या रांगा, त्यात नियोजनाअभावी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

मुनगंटीवारांनी घेतले सहकुटुंब दर्शन; भाविकांचे हाल सुरूच

त्र्यंबकेश्‍वर - ‘बम बम भोले’च्या गजरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनार्थ भाविकांनी त्र्यंबकेश्‍वर फुलून गेले. लागलेल्या प्रचंड मोठ्या रांगा, त्यात नियोजनाअभावी भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून स्नान व दर्शनासाठी गर्दी केली होती. कुशावर्तावर स्नान करून भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भरपावसात रांगेत उभे होते. पहाटे पश्‍चिम दरवाजाने गर्भगृहात जाणाऱ्या भक्तांनी पहाटे चारपासून गर्दी केली होती. हा दरवाजा साडेपाचला उघडण्यात आला. त्यामुळे दरवाजातून प्रवेशासाठी झुंबड उडाल्याने अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. 

आज दुपारी साडेतीनला वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकराजाचे व सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घेतले. सकाळपासून राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दुपारी पालखी सवाद्य कुशावर्तावर नेण्यात आली. उशिरापर्यंत गर्दी होती. तीन दिवस रात्रंदिवस पडणाऱ्या पावसाने शहरात गारवा निर्माण केला आहे. शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी खर्चून केलेली विद्युत योजना मात्र पूर्णतः फसवी ठरली आहे. पंधरा दिवस जेमतेम वीजपुरवठा होतो; तोही खंडित स्वरूपाचा. 

वीज वितरणचा सावळा गोंधळ
मुसळधारेत अनेक भागांत जमिनीत वीजपुरवठा उतरला होता. या खात्याच्या नेहमीच्या अनागोंदी कारभाराचा भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी नाशिक मुक्कामी असतात. एखादी मोठी घटना घडली, तरी दूरध्वनी करून अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याची पाहणी होते. 

मुनगंटीवारांकडून कपालेश्‍वर, काळारामाचेही दर्शन
पंचवटी - पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सहकुटुंब कपालेश्‍वर मंदिरासह काळाराम मंदिरास भेट देऊन देवदर्शन घेतले. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. मुनगंटीवार आज सकाळी पत्नी व सासू-सासऱ्यांसह श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. तेथील दर्शन आटोपून ते तडक रामकुंडावर पोचले. रामकुंडावर त्यांनी सपत्नीक पूजा केली. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍ल, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. नंतर त्यांनी श्री कपालेश्‍वराचे दर्शन घेतले. तेथे मंदिराचे विश्‍वस्त शरद दीक्षित व व्यवस्थापक सुनील जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काळाराम मंदिरात विश्‍वस्त मंदार जानोरकर व गिरीश पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: trambakeshwar nashik news shravan somwar trambakeshwar darshan