भाजप अध्यक्षांवरील कारवाईमुळे पोलिस निरीक्षकांची बदली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज तडकाफडकी बदलीच्या कारवाईस सामोरे जावे लागले. अवैध धंद्यांवरील कारवाईसह कायदा-सुव्यवस्था राखण्यात कसुरी केल्याचे कारण या बदलीसाठी पुढे करण्यात आले असले तरी राजकीय दबावामुळेच नजन-पाटलांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे. 

जळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज तडकाफडकी बदलीच्या कारवाईस सामोरे जावे लागले. अवैध धंद्यांवरील कारवाईसह कायदा-सुव्यवस्था राखण्यात कसुरी केल्याचे कारण या बदलीसाठी पुढे करण्यात आले असले तरी राजकीय दबावामुळेच नजन-पाटलांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे. 

चोपड्यात गुरुवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांना अडविले, त्यावरून वाद होऊन नरेंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष राजू शर्मा व मनीष पारख यांनी पोलिसांशी वाद घातला. निरीक्षक किसनराव नजन-पाटील घटनास्थळी पोचल्यानंतर राजू शर्मा यांनी निरीक्षकांची कॉलर पकडल्याने वाद वाढला. तिघांना चोप देत पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन वादात उडी घेतली. 

तडकाफडकी बदली 
या वादादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी नजन-पाटलांना "तुझी वर्दी उतरवतो..' असे धमकावले होते. आणि आज लगेच दुसऱ्याच दिवशी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नजन-पाटलांची नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्या जागी चोपडा शहर पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेतील मनोज पवार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 

बदलीमागे दिली कारणे 
या बदलीमागे पोलिस अधीक्षक कार्यालयाने नजन-पाटलांनी अवैध धंद्यांवरील कारवाईत कसूर केल्याचे प्रमुख कारण दिले आहे. त्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव यांच्यासह चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी, जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्याकडील अहवालातील नमूद शेऱ्याचा उल्लेख करत के. एल. नजन यांनी अवैध धंद्यांवरील कारवाईत तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यात कसूर केल्याने नजन-पाटलांची बदली करण्याचा सामूहिक निर्णय आजच्या (ता. 7) पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 

मंत्र्यांची फोनाफानी अन्‌ बदली 
चोपड्यात भाजप पदाधिकाऱ्याने निरीक्षकाची कॉलर पकडल्यानंतर त्यांना झालेल्या मारहाण व अटकेमुळे नजन-पाटलांची बदली होणार की अन्य कारवाई, अशी चर्चा कालपासूनच रंगली होती. कालपासून आज दिवसभरातही यासंदर्भात अनेक हालचाली झाल्या. जिल्ह्यातील मंत्र्यांना फोनाफानी झाल्यानंतर मंत्र्यांनीही त्यात "इंटरेस्ट' घेत दबाव आणल्याने नजन-पाटलांना "कंट्रोल जमा' करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळासह राजकीय क्षेत्रातही सर्रास सुरू झाली आहे. 

Web Title: transfer of SP because of political pressure